Breaking News

वनविभागाच्या पिंजर्‍यात तीन वर्षीय मादी बिबट्या जेरबंद

अहमदनगर, दि. 01, ऑक्टोबर - संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात काल शुक्रवारी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास गावातील संजय हासे यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात तीन वर्षाची मादी बिबट्या अडकून तिला पकडण्यात वनविभागाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांत तीन बिबट्यांची धर पकड करून त्यांना जंगलात सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तरी नागरिकांकडून सांगण्यात येत असल्या प्रमाणे अजूनही एक किंवा दोन बिबटे परिसरात आहेत, त्यासाठी वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा बसविण्यात आला आहे. समनापूर शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होत होता, बिबट्यांचा हल्ला हा नेहमीच लहान मुले, वृद्ध, शेळ्या, पाळीव जनावरे इत्यादींवर असत परंतु गेल्या काही दिवसांत ते मोठ्या माणसांनादेखील आपले शिकार करत होते त्यामुळे  ग्रामस्थांना घरातून बाहेर पडणे देखील अवघड झाले होते. वनविभागाने केलेल्या या कार्यवाहीचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.