Breaking News

जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेत नगरचा सहयोग स्पोर्टस क्लब विजयी

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - नगर तालुक्यातील निमगांव वाघा येथे नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेत नगरचा सहयोग स्पोर्टस क्लब अंतिम विजयी ठरला. 
कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांच्या हस्ते झाले. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे, उद्योजक दिलावर शेख, निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, ह.भ.प. भागचंद जाधव, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, अरुण काळे, वलीमोहंमद शेख, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, संतोष ठाणगे, उपसरपंच शंकर गायकवाड, ग्रा.पं. सदस्य गोकुळ जाधव, अरुण फलके, भरत बोडखे, भानुदास ठोकळ, मयुर काळे, सोमनाथ डोंगरे, बाबा चारुडे, प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, दादा डोंगरे, अतुल फलके, राष्ट्रीय ज्युदो तथा कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, कुमार फलके, कुंडलिक पाचारणे आदि उपस्थित होते.
नगर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 9 संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अंतिम सामना सहयोग स्पोर्टस क्लब व शिवसंघर्ष युवा क्लब, टाकळी (खातगाव) यांच्यात होवून, सहयोग स्पोर्टस क्लबने विजय संपादित करत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत जिल्ह्यातील तालुकास्तरीय विजयी संघांना प्रवेश देण्यात आला होता. जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम सामना सहयोग स्पोर्टस क्लब विरुध्द पारनेर संघात झाला. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत या अटीतटीच्या सामन्यात सहयोग स्पोर्टस क्लब विजयी ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तृप्ती गायकवाड हीने बहारदार पोवाड्याचे सादरीकरण केले. प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार्या क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची माहिती देवून, चालू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.
रामदास भोर म्हणाले की, मातीतल्या खेळाने शरीर सदृढ बनते. निरोगी जीवनासाठी मैदानी खेळाची नितांत गरज असून, सोशल मिडीया व संगणकीय युगात युवक मैदानापासून दुरावत आहे. पारंपारिक खेळाची आवड निर्माण होवून उत्तम खेळाडू घडविण्यासाठी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले. बाबाजी गोडसे यांनी युवकांना पारंपारिक मैदानी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेहरु युवा केंद्राच्या वतीने युवकांना दिशा देण्याचे काम चालू असून, सुसंस्कृत व निरोगी युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील द्वितीय शिवसंघर्ष युवा क्लब, टाकळी यांना दीड हजार, तृतीय खंडोबा मित्र मंडळ, निमगाव वाघा यांना एक हजार रुपये व चषक देण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी ठरलेल्या सहयोग स्पोर्टस क्लबला पाच हजार रु. रोख व चषक उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.  स्पर्धेत सहभागी संघांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. गावातील नवनाथ विद्यालयाच्या मैदानात रंगलेल्या कबड्डी स्पर्धेचे सामने पहाण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत पवार यांनी केले. आभार मंदाताई डोंगरे यांनी मानले.