Breaking News

अशोक कारखान्याचे 6 कोटी 5 लाख रुपये बँकेत वर्ग - राऊत

अहमदनगर, दि. 19, ऑक्टोबर - अशोक सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने सन 2016-17 च्या गळीत हंगामातील ऊसाच्या पेमेंटची देय असलेली रक्कम रुपये 3 कोटी 76 लाख व सभासदांच्या जमा ठेवीवरील व्याज रुपये 1 कोटी 15 लाख रुपये तसेच कामगारांच्या बोनसची रक्कम रुपये 1 कोटी 14 लाख अशी एकूण रक्कम रुपये 6 कोटी 5 लाख रुपये संबंधितांच्या शेतकरी व कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री.सोपानराव राऊत यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना श्री.राऊत यांनी सांगितले की, अशोक कारखान्याचे मार्गदर्शक भानुदास मुरकुटे यांनी 61 व्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभात सन 2016-17 च्या गळीतास आलेल्या ऊसाचे प्रति टन रुपये 285.51 प्रमाणे अदा करण्याचे जाहिर केले होते, त्यानुसार सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचे 3 कोटी 76 लाख इतकी रक्कम बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी संबंधितांच्या बँक खाती वर्ग करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या गळीत हंगामात गाळप केलेल्या 1,31,627 मे.टन ऊसास यापूर्वी रुपये 2257.67 प्रमाणे व उर्वरित अदा केलेली रक्कम रुपये 285.51 मिळून शेतकर्‍यांना टनामागे रुपये 2543.18 प्रमाणे अदा करण्यात आल्याचे श्री.राऊत यांनी सांगितले. तसेच अशोक साखर कारखान्याच्या सभासद व बिगर सभासद यांचे जमा ठेवीवरील व्याजाची रक्कम रुपये 1 कोटी 15 लाख रुपये आणि कामगारांच्या बोनसची रक्कम रुपये 1 कोटी 14 लाख देखील संबंधितांच्या बँकखात्यात वर्ग करण्यात आली आहे. सभासद व ऊस उत्पादकांच्या सदरच्या पेमेंटची बिले संबंधितांना कारखान्याच्या शेतकी विभागाच्या कर्मचार्‍यांमार्फत पोहोच केली जाणार असल्याची माहिती श्री. राऊत यांनी यावेळी दिली.