Breaking News

दुरान्तो एक्सप्रेसचे इंजिन घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

सावंतवाडी, दि. 27, ऑक्टोबर - एर्नाकुलम-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरान्तो एक्सप्रेसचे इंजिन घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक आज दुपारपासून ठप्प झाली आहे. काही  गाड्या मार्गावर थांबवून ठेवण्यात आल्या असून काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
याबाबत कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार एर्नाकुलम-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरान्तो एक्सप्रेसचे इं जिन आज दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी सावंतवाडी रोड आणि झाराप या स्थानकांच्या दरम्यान रुळावरून घसरले. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र रेल्वेची वाहतूक  विस्कळित झाली आहे. वाहतूक पुन्हा सुरळित व्हायला सहा तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली, तरी सायंकाळी सुटणार्‍या काही गाड्यांचे सुधारित वेळापत्रकही कोक ण रेल्वेने जाहीर केले आहे. त्यानुसार आज सायंकाळी पावणेपाच वाजता सुटणारी मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस अडीच तास उशिराने म्हणजे सायंकाळी सव्वासात वाजता,  तर सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस साडेपाचऐवजी दोन तास उशिरा म्हणजे साडेसात वाजता सुटणार आहे. करमळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी आज दुपारी एकच्या  ऐवजी सायंकाळी सात वाजता रवाना होणार आहे. कोचुवेली-मुंबई सीएसटी गाडी दुपारी सव्वातीन वाजता पेडणे (गोवा) स्थानकात, तर दादर-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर गाडी  दुपारी 3 वाजल्यापासून नांदगाव (ता. कणकवली) स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.