Breaking News

कारागृहात कैद्यांमधील माणूस उभा करण्याचे काम

नगरच्या कारागृहात राबविले जातात विविध उपक्रम 

विजय गोबरे/ अहमदनगर, दि, 12, ऑक्टोबर - कारागृह म्हट्लेकी अनेकांना भीती वाटते, अनेकजण जेलमधील कैद्यांबद्दल घृणा व्यक्त करतात, पण चुका झालेली तीही अखेर माणसेच  आहेत, त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, विविध गुन्हे हातून घडल्याने समाज,नातलग तुटलेले असतात, पोलिसांचा दंडुका पाठीवर असतो, जग छी थू करीत असते, मन खचलेले  असते, अशावेळी मनाला उभारी देण्याचे काम केले तर कैद्यांचे जीवन थोडेसे सुसह्य होईल,आणि असेच काम येतील सबजेल  मध्ये सूरू आहे, कैद्यांमधील माणूस उभे करण्याचे काम!
कारागृहामध्ये अनेक तर्हेवाईक बंदी असतात.अनेक गुन्ह्यामध्ये दोषी झालेले कैदी,विविध मानसिकता असणारे  कैद्यांचा समावेश यात असतो.समाज यांना कायम गुन्हेगार या स्वरूपामध्येच  पाहत असतो.परंतु कारागृहामध्ये या कैद्यांना गुन्हेगारी वृत्ती पासून परावृत्त करून   माणूस बनवण्याचे कार्य कारागृहातील पदाधिकारी करत असतात.सुधारणा व पुनर्वसन  या ब्रिदवाक्याचे  तंतोतंत पालन हे अधिकारी करत असतात.   अशाच पद्धतीचे  गुन्हेगारास मनुष्य बनवण्याचे कार्य नगरमधील अहमदनगर जिल्हा कारागृहामध्ये (सबजेल) चालू आहे.कारागृहामधील कैद्यांना  गुन्हेगार न मानता त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे कार्य कारागृहामधील सर्व कर्मचारी,पदाधिकारी,अधीक्षक ,करत असतात.सबजेल मधील अधीक्षक एन.जी.सावंत,सिनियर जेलर  शामकांत शेडगे यांनी कैद्यांसाठी विविध उपक्रमाचे शेड्युल ठरवले आहे.  व्यक्ती हा गुन्हेगार  नसून त्याच्यामध्ये असणारी प्रवृत्ती गुन्हेगार आहे त्यामुळे  गुन्हेगारास त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती  सोडण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य या ठिकाणी चालते.यामध्ये कैद्यांसाठी कीर्तन,भजन यांसारखे धार्मिक कार्यक्रम  आयोजित करून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचे कार्य चालू आहे.कैदी  विविध  व्यसनांच्या  आहारी गेलेला असतो .त्या व्यसनांपासून त्यांना मुक्त करण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन जेल मध्ये हे अधिकारी वर्ग करत असतात.कैद्यांनाही भावना असतात हे जाणून त्यांना  त्यांच्या कुटुंबाशी सवांद साधता यावा यासाठी इंटरकॉम सुविधा सुसज्ज केली आहे.कैद्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष पुरवले जाते.दररोज ताजे व गरम अन्न दिले जाते. तसेच त्यांच्या  आरोग्याच्या विविध चाचण्याही घेण्यात येतात.
या आणि अशा अनेक प्रकारची सत्कार्य करणार्‍या आणि समाजाने तिरस्कार केलेल्या  गुन्हेगारी प्रवृत्तींना नष्ट करण्याचे कार्य करणार्‍या या कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे  लागते.शासनाकडून,समाजाकडून हा वर्ग नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे.या कारागृहास मूळ समस्या आहे ती परिसरातील नागरिकांकडून होणार्‍या कचर्‍याची.महानगरपालिकेने केलेल्या कचरा  डेपोमध्ये कचरा न टाकता तो कचरा कारागृहाच्या परिसरात टाकला जातो.त्यामुळे कर्मचारी व कैदी यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.शासनाने आज विविध गोष्टींकडे लक्ष देणे  गरजेचे आहे.कारागृह कर्मचार्‍यांना पोलीस विभागाच्या बरोबरीचा पगार दिला जावा तसेच पोलिसांना असणारे शासकीय जी.आर.याही कर्मचार्‍यांना लागू करावेत.आज सबजेलची क्षमता 69  कैद्यांची आहे परंतु सद्यस्थितीला त्यामध्ये 220 कैदी आहेत.हा अतिरिक्त तणावास हे कर्मचारी तोंड देत आहेत.कारागृहातील या शासकीय कर्मचार्‍यांची असणारी कामकाजाची वेळ कमी  करण्याकडेही  लक्ष देणे गरजेचे आहे.आज हा कर्मचारी वर्ग सलग 13 तास अविरत कार्य करत असतो.त्यासाठी शासनाने पुरेसे  मनुष्य बळ उपलब्ध करून ही वेळ कमी करण्याकडेही लक्ष  देणे गरजेचे  आहे.शासकीय रुग्णालयातही कैद्यांना उपचार करतेवेळेस  त्यांकडून कर्मचार्‍यांना अनेकदा अरेरावीस सामोरे जावे लागते.   अशा अनेक समस्यांना सामोरे जात त्यावर  उपाययोजना करत हा कर्मचारी वर्ग माणुसकीचा उदार दृष्टिकोन समोर ठेवून अविरत कार्य करत आहेत.या डिपार्टमेंट बद्दल   थोडीशी माणुसकी व आदर  समाजाने व शासनानेही दाखवला  पाहिजे.
कारागृहाचे ब्रीद वाक्य सुधारणा व पुनर्वसन या उक्तीप्रमाणे कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन करण्याचा प्रयत्न कारागृह विभागाकडून केला जातो.     गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करुन त्याला चांगला  माणूस बनविणे हे महत्वाचे असते. समस्या या चालूच असतात. परंतु समस्यांना तोंड देत कैद्यांना गुन्हेगार न समजता  एक  मनुष्य समजून आम्ही आमचे कर्तव्य पार पडत असतो. 
- एन. जी. सावंत (अधीक्षक, अहमदनगर जिल्हा कारागृह)
सुधारणा व पुनर्वसन या तत्वानुसार
कारागृहामध्ये होणारे कार्यक्रम
1) कीर्तन, भजन, प्रवचनाच्या माध्यमातून मतपरिवर्तन करणे.
2) व्यसनमुक्ती कार्यक्रम करणे.
3) गांधीजींच्या विचारांचे लेखन व व्याख्यान आयोजित करणे.
4) कायदे विषयक सल्ला व मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे.
5) सर्व धर्मीय सन, उत्सव साजरे करणे.
6) साथीच्या रोगांचे निवारणासाठी चाचण्या घेणे.
7) कैद्यांच्या  सुरक्षेसाठी कंट्रोल रूम तयार करून 24 तास सुरक्षा देणे.
8) टेलिमेडिसिन सुविधा पुरवणे.
9) आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असणार्‍या कैद्यांसाठी बंदी सेल्फ हेल्प गृप तयार करणे.