Breaking News

डोळे, किडनी, यकृताचे दान.. हृदयही उपयोगात यायला हवे होते

सोलापूर, दि. 13, ऑक्टोबर - पत्नीचे हृदय दुसर्‍याच्या शरीरातून धडधडत राहिले असते तर तिचा आत्मा जिवंत राहिला असता, असेच वाटले असते. पण दुर्दैवाने तसे झाले  नाही, अशी भावना पाच अवयवांचे दान करणार्‍या मृत कविता डिकरे यांचे पती जगन्नाथ डिकरे यांनी ओल्या डोळ्यांनी व्यक्त केली. कारण आवश्यक ते सर्व अवयव दान करण्याची  तयारी केली होती.
पण हृदय रोपणासाठी वेळेत रुग्ण मिळाल्याने त्याचा उपयोग झाला नाही. दरम्यान सोलापूरकरांनी तिसर्‍यांदा अवयवदानाची घटना अनुभवली. सकाळी सात वाजता सुरू झालेली  अवयव काढण्याची आणि रोपण करण्याची ही प्रक्रिया जवळपास 12 तास चालली. तर अवयव नेणारा सोलापूर-पुणे कॅरिडॉरला महामार्गाने चार तासांचा कालावधी लागला.
वीज पडून ब्रेनडेड झालेल्या कविता डिकरे (रा. हिवरे, ता. मोहोळ) या महिलेचे अवयव दान करण्यात आले. सोलापुरात अवयव दानाची ही सहा महिन्यातील तिसरी घटना आहे.  यापूर्वीचे अवयवदाते शिवपार्थ कोळी (उस्मानाबाद), तर ओंकार महिंद्रकर (बीदर) होते. मृत कविता या सोलापूर जिल्ह्यातील अवयवदान करणार्‍या पहिल्याच महिला ठरल्या.
यशोधरा रुग्णालयात ब्रेनडेड पेशंटचे अवयवदान करण्याची ही पहिलीच घटना आहे. अवयव काढून घेऊन रुग्णवाहिका रवाना पुण्याकडे रवाना झाली. येथील आदित्य बिर्ला  रुग्णालयात ती दुपारी साडेबारास पोहोचली. तर सकाळी दहाच्या सुमारास एक किडनी यशोधरात तर दुसरी अश्‍विनी रुग्णालयात पाठविण्यात आली. डोळे शासकीय रुग्णालयाला दान  करण्यात आले. त्याचे गरजूंना प्रत्यारोपण होईल.
माझी बहीण खूप कष्टाळू आणि गोड स्वभावाची होती. अत्यंत जिद्दीने संसाराचा गाडा ओढत होती. शेतकामामध्ये ती रमून काम करायची. दोन महिन्यापूर्वी तिने दिवसरात्र एक करून  तिच्या शेतात धान्य पेरले हेाते. तिने रोवलेल्या ज्वारीवरचा फुलोरा तिची प्रतीक्षा करेल, तेसुध्दा ओल्या नजरेने माझ्या बहिणीची वाट पाहतील, - सोमनाथ गवळी, कविताचाभाऊ
माझी पत्नी कविता मनमिळावू आणि गोड स्वभावाची होती. दोन्ही मुले उच्चशिक्षित व्हावीत, त्यांचा समाजात खूप मान सन्मान व्हावा असे तिचे स्वप्न होते. मला खूप समजून घेत  होती. घरातील सर्वांची खूप काळजी करायची. दुर्दैवाने काळाने घाला घातला. डॉक्टरानी तिला ब्रेनडेड घोषित करताच मी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. - जगन्नाथ  डिकरे, कविताचे पती