Breaking News

दलित आदिवासींच्या निधीला संरक्षित करण्यासाठी कायदा करणार - रामदास आठवले

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - दलित आदिवासींच्या विकास निधीतील रक्कम इतर विभागाकडे वळविण्यात येऊ नये. तसेच तो निधी त्या आर्थिक वर्षात खर्च झाला नाही तरी तो  पुढील वर्षी वापरता यावा, असा कायदा महाराष्ट्र सरकारने करावा यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मीरारोड येथे केले.
दलित आदिवासीच्या विकासनिधीतून एकूण 1500 कोटीची रक्कम शेतकरी कर्जमाफीसाठी वळविण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आठवले बोलत होते. अनुसूचित जातीजमातीच्या विक ास निधीतून जी रक्कम शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाने वळविली आहे ती काही काळाने पुन्हा अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी परत करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना  भेटून मागणी करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
मीरारोड येथील पेणकर पाडा येथे मोफत सेवेसाठी रिपाइंतर्फे रुग्णवाहिकेचे आठवलेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आठवले यांनी दलित विकास निधीला संरक्षण देणार तसेच  रिपाइं कार्यकर्त्यांनी लोकसेवेत कायम संपर्कात राहिले पाहिजे. सर्वधर्मीय गरिबांच्या न्याय हक्कासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन आठवले यांनी केले.  यावेळी आठवलेंचा सत्कार करण्यात आला.