Breaking News

पदपथावरील राहणार्‍या मुलांसाठी अभ्यंगस्नानाचे आयोजन

पुणे, दि. 16, ऑक्टोबर - पदपथावरील राहणार्‍या मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी आज सोमवारी  सकाळी शाही अभ्यंगस्नान आयोजित केले होते . 
खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही केवळ परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. आई-वडिलांसह पदपथावर राहणार्‍या या  मुलांची सोमवारची सकाळ मात्र आनंददायी ठरली. कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून घातलेला रांगोळ्यांचा सडा आणि मांडलेले पाट हे चित्र बघून ती मुले हरखून गेली.  माजी उपमहापौर आबा बागुल , जयश्री बागुल , अमित बागुल , हर्षदा बागुल आणि समस्त बागुल कुटुंबियांसह कार्यकर्त्याकडून या मुलांना सुवासिक तेल - उटणे लावून त्यांचे  औक्षण करून मंगलमय वातारणात हा शाही अभ्यंगस्नानाचा सोहळा रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि नागरिकही त्यात सहभागी होत होते.
शाही अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे , फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने ’त्या ’ मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला तर हा सुखद सोहळा पाहणार्‍या ’त्या’  मुलांच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहावयास मिळत होते.
यावेळी या उपक्रमाचे संयोजक अमित बागुल म्हणाले , माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवितो. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. महागाई दिवसें दिवस वाढत आहे. परिस्थितीने पदपथावर राहणार्‍या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी शिकण्या - खेळण्याच्या वयात सिग्नलवर फुले किंवा अन्य वस्तू विकणार्‍या या मुलांना  दिवाळीचा आनंद मिळावा या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवित असतो. या उपक्रमात रोटरी क्लब शनिवारवाडा या संस्थेचे पदाधिकारी अँड चंद्रशेखर पिंगळे, अभिषेक बागुल,गोरख  मरळ,शाम काळे,सोमनाथ कोंडे,महेश ढवळे,हेमंत बागुल , सागर आरोळे,विक्रम खन्ना, अशोक शिंदे, विजय बिबवे,धनंजय कांबळे,सुरेश कांबळे,योगेश निकाळजे, इम्तियाज तांबोळी,  राहुल बागुल,राजाभाऊ पोळ, सुयोग धाडवे,दीपक गोरखा,पंकज गायकवाड हे सहभागी झाले होते.