Breaking News

सांगली येथे बुवाबाजी करणार्या पुरूष व महिलेला अटक

सांगली, दि. 28, ऑक्टोबर - अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून अनेक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी करणी व जादूटोणा करून बुवाबाजी करणार्या एका पुरूष व महिलेला अंधश्रध्दा  निर्मूलन समितीच्या मदतीने आष्टा पोलिसांनी अटक केली.
अटक केलेल्यात मुबारक महंमद नदाफ (वय 52, रा. महादेव मंदिरानजीक, मालगाव, ता. मिरज) व श्रीमती कल्पना प्रकाश आत्तरकर (वय 35, रा. पाचुंब्री, ता. शिराळा) या  दोघांचा समावेश आहे. या दोघांविरोधात अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013 कलम 3 (2) अनुसूची 5 अन्वये आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.
हे दोघेही आष्टा येथील शिवाजी चौकात एका भाड्याच्या खोलीत गत चार वर्षापासून भोंदूगिरी करीत होते. त्यांनी वधू- वर सूचक केंद्रही थाटले होते. दैवी सामर्थ्य असल्याची  बतावणी करून करणी काढणे, भूतबाधा काढणे, पती- पत्नी अथवा प्रियकर- प्रेयसी यांच्यातील भांडण मिटविण्यासाठी गंडेदोरे देऊन उपचार करीत काही महिलांना अघोरी  उपचारही करायला सांगत. याशिवाय वधू- वर सूचक केंद्राच्या नावाखाली युवक- युवतींचा विवाह जमविणे व त्यातून अव्वाच्या सव्वा रकमा उकळणे आदी प्रकार सुरू केले होते.
ही माहिती आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांना मिळाली होती. या माहितीआधारे त्यांनी एका महिलेला बोगस ग्राहक म्हणून या दोघांकडे पाठविले असता भोंदू गिरीचा हा प्रकार सामोरा आला होता. त्यांनी याची माहिती अंनिस पदाधिकार्यांनाही दिली होती. ठरल्यानुसार फिर्यादी महिला व अंनिस कार्यकर्ते या दोघांच्या घरी समस्या घेऊन गेले  होते. त्यावेळी या दोघांनी ही समस्या सोडविण्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी करून उपचारासाठी 500 रूपये घेतले होते.
हा प्रकार सुरू असतानाच मिलिंद पाटील व अंनिसच्या पदाधिकार्यांनी छापा टाकला. त्यावेळी घरात बुवाबाजीचे साहित्य, मोर पिसांचा गुच्छ, लाकडी पादुका, पुस्तके, मनी, हळद-  कुंकू, चौकोनी व गोल ताईत व काळ्या बाहुल्या असे साहित्य मिळून आले. या दोघांनाही आष्टा पोलिसांनी अटक केली आहे.