Breaking News

शक्ती संचयाला सत्ता प्रभावाचे आव्हान

दि. 03, ऑक्टोबर - असतील शीतं तर जमतील भुतं या म्हणीचा प्रत्यय एरवी कुठे येवो ना येवा पण राजकारणात विशेषतः सत्तेच्या साठमारीत नक्कीच  येतो.सत्याधार्यांभोवती खुशमस्कर्यांची ,निष्ठावंतांची नेहमीच गर्दी असते.हे जेव्हढे खरे तितकच आणखी एक वास्तव आहे,ते म्हणजे ज्याच्या अवती भोवती  खुशमस्कर्यांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांची गर्दी जाणवते त्यालाच सत्ता साद घालते,कार्यकर्ते आणि समर्थकांच्या शीतांवर नेत्याचे राजकारण सत्ताकारण निर्भर बनल्याने  सत्ता आणि ताकद या दोन गोष्टी गुण्या गोविंदाने नांदू लागल्या आहेत.म्हणूनच शक्तीप्रदर्शन हा आजच्या राजकारणात नेत्यासाठी अविभाज्य घटक बनला  आहे.शक्तीप्रदर्शन करून हवं ते प्राप्त करण्याचं नवं युग राजकारणात सुरू झाले आहे. गेल्या आठ दहा दिवसात घडलेल्या अनेक घडामोडींपैकी तीन घटना ज्या  राजकारणातील या शक्तीप्रदर्शनाच्या पार्श्‍वभूमी इव्हेन्ट आफ द वीक ठरल्या असे म्हटले तरअजिबात अतिशोयोक्ती होणार नाही.
काँग्रेसमध्ये सातत्याने होत असलेली कुचंबणा असह्य झाल्याने स्वाभीमानी नारायण राणे यांनी का़ँग्रेस पक्षाचा बहुचर्चित त्याग केला.आणि जवळपास आठ दिवस  कुठलीही भुमिका जाहीर न करता दिल्लीत अमित शाह यांच्याशी गुप्तगू केले.उभयतांच्या या गुप्तगूवर मतमतांतरे आहेत.माञ विद्यमान परिस्थिती लक्षात घेता शाह यांनी  राणे यांना काय सल्ला दिला असेल? आणि तो सल्ला देण्यात त्यांनी कुठला दृष्टीकोन समोर ठेवला असेल हे सहज लक्षात येते.राणे यांनी काँग्रेस सोडण्यामागची कारणे  तपासून पाहील्या नंतर महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीत नारायण राणे यांना थेट भाजप प्रवेश देऊन डोकेदुःखी वाढवून घेण्याइतपत अमित शाह कच्चा  लिंबू नाहीत.राणेंना भाजपात घेणे म्हणजे आधी त्यांचे मंञीमंडळात पुनर्वसन करणे,तेही पहिल्या दोन किंवा क्रमांकाचे खाते देऊन.निष्ठावंत भाजपेयी नाराजी ओढवून  घेणारे हे पाउल शाह  यांच्यासारखा राजकारणी उचलणार नाही.सोबत सत्तेच्या नावेत बसलेला सहप्रवाशी शिवसेनेलाही नाराज न करण्याचे आव्हान त्यांच्या समोर  होते.सर्वात महत्वाचा मुद्दा नारायण राणे भाजपात येत असतील तर सोबत किती आमदार आणू शकतात याचाही अंदाज शाह यांनी नक्कीच घेतला असणार.राणे  सर्वशक्तीनिशी भाजपात येऊन महाराष्ट्र भाजपाची विधीमंडळातील ताकद वाढवू शकले असते तर शिवसेनेच्या कुबड्यांचा रोज मार खाण्याची नौबत टाळण्यास बळ  मिळाले असते.शिवसेनेच्या कुबड्या फेकून देण्यास राणेंचा हातभार लागत नाही,म्हणजेच विधीमंडळात असलेले शक्तीप्रदर्शन दाखविण्यास राणे सपशेल अपयशी ठरले  म्हणून भाजप प्रवेश टाळून महाराष्ट्रात नव्याने स्वाभीमान रूजविण्याचा सल्ला शाह यांनी दिला.
या नंतरची राणे यांची राजकीय वाटचाल पुन्हा स्वाभीमानी शक्तीप्रदर्शनावरच अवलंबून असणार आहे.भाजपा विशेषतः शाह यांच्या कृपेवर ही वाटचाल सुरू राहणार  असली तरी राणेंच्या शक्तीचे खच्चीकरण समांतर सुरू राहणार यात शंका नाही.स्वपक्षातील एखादा नेता समाजाच्या नावावर,प्रवर्गाच्या नावावर ,जात समुहाच्या  नावावर शक्तीप्रदर्शन करून सत्तेला आव्हान देऊ पहात असेल तर त्याची सत्तेवर प्रभाव असणारी धुर्त मंडळी कोण अवस्था करतात याचा अनुभव या आधी छगन  भुजबळ आणि काल परवा पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.भुजबळ मुंडे यांच्या तुलनेत महाराष्ट्र व्यापी शक्तीप्रदर्शनात नारायण राणे कुठल्याच खीजगणतीत नाहीत.अशा  परिस्थितीत अमित शाह महाराष्ट्र भाजपेयींकडून राणे यांची ताकद एका मर्यादेपलिकडे वाढू  न देता केवळ भाजपासाठी बाहुले म्हणून वापर करून घेतांना दिसले तर  अजिबात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही.
अमित शाह किंवा भाजपाच्या दृष्टीने शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासमोर भोखाडा म्हणून राणे यांचा वापर करणे एव्हढेच उद्दीष्ट असण्याची शक्यता नाकारता येणार  नाही.ताकद वाढत असतांना त्या नेत्याच्या पायाला दोर बांधून खुंटी कशी ठोकायची यात विद्यमान सत्ताधार्यांचा चांगलाच वकूब आहे.भुजबळ यांना अखिल भारतीय  ओबीसी समाजाचे नेते म्हणून मान्यता मिळत असतांना प्रती सत्तास्थान निर्माण होत असल्याची जाणीव झालेल्या तत्कालीन आणि विद्यमान प्रस्थापितांनी संगनमताने  भुजबळांच्या पायात अडकवलेली बेडी असो नाहीतर गोपीनाथ कन्या पंकजा मुंडे यांच्या कालच्या माधव मेळाव्यावरून पेटलेले राजकारण असो, या गोष्टींचा सुक्ष्म  अभ्यास करूनच नारायण राणे यांनी पावले टाकणे हिताचे ठरेल.