Breaking News

चोरांची दिवाळी; एकाच रात्रीत चार घरे फोडून पावणे दोन लाखांचा माल लंपास

परभणी, दि. 16, आक्टोबर - ऐन दिवाळीच्या तोंडावर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे 14 ऑक्टोबर रोजी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत चार  घरे फोडून मोबाईल, मोटारसायकल, सोन्याच्या दागिन्यांसह पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला़. देवगावफाटा येथे आसाराम मोरे यांच्या कुलूप बंद असलेल्या घरात चोरट्यांनी  कुलूप तोडून आत प्रवेश केला़ कपाटातील तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने , तसेच एमएच 23 एज़ी़ 7872 या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली़. याच बरोबर मदन बहिरट यांच्या  घरातील रोख 15 हजार रुपये, मधुकर मोरे यांच्या घरातील मोबाईल, सुखदेव मोरे यांच्या घरातील 10 हजार रुपये चोरट्यांनी पळविले़ शनिवारी (दि. 14) मध्यरात्री या चारही  घरांत चोरीच्या घटना घडल्या़. या चोरीच्या घटनांची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या घटनेनंतर परभणी येथून श्‍वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते़. यानंतर श्‍वानाने  गावापासून मुख्य मार्गावरील पुलापर्यंत या चोरट्यांचा माग काढला़