पूर्णा पॅसेंजरमध्ये सापडले स्त्रीजातीचे अर्भक
परभणी, दि. 16, आक्टोबर - हैदराबाद-पूर्णा पॅसेंजर गंगाखेडहून परभणीकडे येत असताना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका डब्यात दोन सीटमध्ये आठ दिवस वयाचे स्त्री जातीचे अर्भक कपड्याच्या झोळीत ठेवून दिलेले बेवारस अवस्थेत सापडले. रेल्वे पोलिसांनी चाईल्ड लाईनच्या मदतीने या बाळाला परभणी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. ही गाडी सिंगणापूरजवळ आल्यानंतर बेवारस स्थितीत असलेल्या या अर्भकाची माहिती काही सतर्क प्रवाशांना होताच त्यांनी ही माहिती रेल्वे कर्मचा-यांना दिली़. त्यानंतर परभणीच्या रेल्वे स्टेशन प्रबंधकांना अर्भकासंदर्भात माहिती देण्यात आली़. रेल्वे गाडी परभणी स्थानकावर आल्यानंतर रेल्वे पोलीस फोर्सच्या कर्मचा-यांनी या अर्भकास ताब्यात घेतले व चाईल्ड लाईनच्या पथकाला पाचारण केले़. रेल्वे पोलीस दलाचे निरीक्षक उपाध्याय, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदीप बेंडसुरे, सय्यद इशरद, कृष्णा फुलारी आदींनी या चिमुकलीला ताब्यात घेऊन तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले़. आठ दिवसांच्या या चिमुकलीची प्रकृती ठणठणीत आहे व ती सुरक्षित असल्याचे चाईल्ड लाईनचे संदीप बें डसुरे यांनी सांगितले़.