Breaking News

धरणग्रस्त शेतकर्‍यांचा सोमवारपासून उपोषणाचा इशारा

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - शेतजमिनीमध्ये ये-जा करण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी वेळोवेळी अर्ज, निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या  निषेधार्थ वहिवाटीसाठी त्वरीत रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी  सोमवार (दि. 23) पासून शेतातच  आमरण उपोषण करण्याचा इशारा  ढोरसडे  (ता. शेवगाव) येथील 11 धरणग्रस्त शेतक-यांनी दिला आहे. 
ढोरसडे येथील धरणग्रस्त शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने तहसिलदार दीपक पाटील यांना या बाबतचे निवेदन दिले. ढोरसडे शिवारातील सर्व्हे क्र. 55, 49, 48,  56, 35, 36 मध्ये धरणग्रस्त 11 शेतकरी कुटूंबाची  सुमारे 70 एकर शेतजमीन आहे. जायकवाडी धरण झाल्यानंतर ढोरसडे शिवारातील काही शेतजमिनी  व  जुने रस्ते पाण्याखाली गेले. त्यानंतर सन 1986 पासून  या धरणग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या राहिलेल्या शेतजमीनीत जाण्यासाठी जवळचा रस्ता अद्यापही  नाही. तेव्हांपासून रस्ता खुला करण्यासाठी पुनर्वसन खाते व महसूल प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, कार्यवाही न झाल्याने हे शेतकरी चितांक्रांत  आहेत.  मागील पाच ते सहा वर्षे दुष्काळात गेल्यानंतर यंदा चांगला पाऊस झाल्याने पिके घेण्यासाठी शेतकर्‍यांत उत्सुकता आहे. मात्र, शेतजमीनीत  जाण्यासाठी रस्ता खुला नसल्याने गहू, हरबरा पिकांची पेरणी करायची कशी, असा प्रश्‍न त्यांच्या समोर आ वासून उभा ठाकला आहे. प्रातांधिकारी,  तहसिलदार व पुनर्वसन खाते या सर्वांकडे पाठपुरावा केल्यानंतरही या प्रश्‍नी शेतकरी हक्काच्या रस्त्याच्या न्याय मागणीच्या प्रतिक्षेत आहेत. तहसिलदारांनी  स्वतः समक्ष येऊन पाहणी करून शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला करून द्यावा अन्यथा सोमवार (दि. 23) पासून आमरण उपोषणास बसण्याचा  इशारा   दत्ता माळवदे, गणेश खंबरे, भाऊसाहेब माळवदे, अनिकेत गोसावी, दत्तू शित्रे, सोपन खंबरे, भाऊसाहेब शित्रे,  भगवान काळे, रामदास काळे,  दिलीप खंबरे, रघुनाथ काळे आदी धरणग्रस्त शेतक-यांनी केली.