Breaking News

वाशी येथे बंदुकीचा धाक दाखवून दोन कोटी रुपये लुटले

नवी मुंबई, दि. 29, ऑक्टोबर - वाशी सेक्टर 17 येथील कुसुम सोसायटीतील एका व्यापा-याच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी भरदिवसा 2 कोटी 96  लाखांचा ऐवज लंपास केला. एक महिला व पाच पुरुष असे सहाजण या दरोड्यात सहभागी होते. एपीएमसीमधील व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. भर  दुपारी या इमारतीत सहा जणांनी प्रवेश केला. मेनकुदळे यांच्या सहाव्या मजल्या वरील घराची एकाने बेल वाजवल्यावर त्यांच्या मुलीने दरवाजा उघडताच कुरीयर असल्याचे सांगून कु रीयर देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. त्याच वेळी जिन्यात दबा धरून बसलेल्या चार जणांनीही घरात प्रवेश करून मेनकुदळे यांची पत्नी व मुलीला बंदुकीचा व चाकूचा धाक  दाखवून घरातील एका खोलीत डांबून ठेवले. घरातील सर्व कपाटे धुंडाळून दरोडेखोरांनी दागिने व रोकड असा 2 कोटी 96 लाखांचा ऐवज घेऊन पळून गेले. या प्रकरणी वाशी  पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला. सहाव्या मजल्यावर सीसीटिव्हीमध्ये सर्व आरोपींचे चेहरे कैद झाले असून पोलिसांनी हे  फुटेज ताब्यात घेतले आहे.