Breaking News

नाशिक एसटी महामंडळात अखेर चार शिवशाही बस दाखल

नाशिक, दि. 03, ऑक्टोबर - अनेक दिवसांपासून असलेली ‘शिवशाही’ बसची प्रतीक्षा संपली असून नाशिक एस.टी. महामंडळात अखेर चार शिवशाही बस दाखल  झाल्या आहेत. या शिवशाहीच्या नाशिक-पुणे पहिल्या सेवेचा प्रारंभ आज सकाळी सव्वाअकरा वाजता ठक्कर बसस्थानक येथे झाला. पहिल्याच दिवशी धावलेल्या  चारही गाड्यांना प्रवाशांनी पसंती देत गर्दी केल्याचे चित्र होते.
विभाग नियंत्रक यामिनी जोशी व उपस्थित अधिकार्यांच्या हस्ते पूजन होऊन या बसचा प्रारंभ करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या ‘शिवशाही’ बसचे दर हे  ‘शिवनेरी’पेक्षा निम्मे असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एस.टी. महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले.
सध्या नाशिक-पुणे प्रवासासाठी शिवनेरीचे दर 600 रुपये असून शिवशाहीचे 346 रुपये इतके असणार आहेत. तसेच शिवशाही वातानुकूलित असून प्रवाशांना  आरामदायी प्रवास करता येणार आहे. पुण्याच्या दिशेने पहिली शिवशाही बस सकाळी सव्वाअकरा वाजता धावल्यानंतर पुढील तीन शिवशाही एक-एक तासाने  पुण्याकडेच धावल्या. सध्या नाशिक-पुणे मार्गावर शिवनेरी, हिरकणी व साध्या अशा सहा प्रकारच्या बसेस धावत आहेत.
हिरकणीच्या चार बसेस कमी करून त्याऐवजी चार शिवशाही बसेस धावणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी एकूण 100 शिवशाही बसेसची मागणी करण्यात आली  आहे. पहिल्या टप्प्यात 20 शिवशाही बसेस मिळणार आहेत. तर उर्वरित टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत.
सर्व शिवशाही बसेस दाखल झाल्यानंतर शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर यासह बडोदा, अहमदाबाद, इंदोर आदी ठिकाणी बस सोडाव्यात, असा प्रस्ताव  वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. दिवाळीत मोठ्या संख्येने प्रवासी नाशिक-पुणेदरम्यान प्रवास करतात.
दरम्यान, वातानुकूलित बसची संख्या महामंडळाकडे कमी असल्याने बहुतेकजण ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून प्रवास करतात. आता शिवनेरीच्या जोडीला शिवशाही  आल्याने दिवाळीत याचा महामंडळाला उपयोग होऊन चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिक-पुणे मार्गावर धावणार्या शिवशाहीला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे एस.टी. प्रशासनाचे लक्ष असून जास्तीत जास्त प्रवाशांनी शिवशाही  बसमधून प्रवास करावा, असे आवाहन एस.टी. प्रशासनाने केले आहे.