Breaking News

रमेश कदम यांना रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद?

रत्नागिरी, दि. 27, ऑक्टोबर -  चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली असून त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दिले जाण्याचे संकेत  खासदार हुसेन दलवाई यांनी दिले.
प्रदेश काँग्रेसमध्ये गेली काही वर्षे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरुद्ध माजी मुख्यमंत्री नारायण राणे असे दोन गट सक्रिय झाले होते. राणेंची कोंडी करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रयत्न  झाले. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीचे जिल्हाध्यक्षपद दीर्घकाळ रिक्त ठेवण्यात आले. या पदासाठी माजी खासदार नीलेश राणेंनी कार्यकर्त्यांची शिफारस केली होती. त्याकडे  प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. राणेंनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, त्याच दरम्यान विश्‍वनाथ पाटील यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर  जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यामध्ये चिपळूणचे इब्राहीम दलवाई, सुधीर दाभोळकर, संजय रेडीज, खेडचे विजय भोसले, देवरूखचे राजन देसाई यांच्यासह  काही जणांची नावे चर्चेत होती. सुरेश कातकर यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी खोटी कागदपत्रे गोळा करून प्रदेशकडे पाठविल्याची तक्रार विजय भोसले यांनी खेड पोलीस ठाण्यात केली  होती.
एकूणच जिल्हाध्यक्षपदासाठी जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असताना काँग्रेसच्या श्रेष्ठींनी राजापूर येथील विधान परिषदेच्या सदस्या हुसनाबानू खलिफे यांना  जिल्हाध्यक्षपद देण्याची तयारी सुरू केली होती. प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. जिल्हाध्यक्षदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना हे  समजल्यानंतर त्या सर्वांनी एकत्र येऊन इब्राहीम दलवाई यांना जिल्हाध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याचे ठरवले होते. परंतु भाजपमधून नुकतेच बाहेर पडलेले रमेश कदम यांचा का ँग्रेसप्रवेश निश्‍चित झाल्यास खलफे यांच्यासह इतर इच्छुकांची नावे मागे पडणार आहेत. रमेश कदम यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांचे प्रयत्न सुरू  आहेत. ते कदम समर्थकांच्या गाठीभेटी घेत आहेत. राष्ट्रवादीतील त्यांच्या समर्थकांच्या बैठका घेऊन त्यांनाही पक्षात येण्याचे निमंत्रण देत आहेत. कदम काँग्रेसमध्ये दाखल झाले, तर  त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.