Breaking News

देशाचा उल्लेख भारत असाच केला पाहिजे - रामदास आठवले

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - संविधानाने आपल्या देशाचे नाव भारत असे अधिकृत केले आहे. प्राचीन काळापासून असलेल्या भारतवर्ष या नावांपासूनच  भारत हे नाव आपल्या देशाचे राहिले आहे. विविध जातीधर्माचे लोक या देशात राहत असल्याने आपल्या देशाचा उल्लेख कोणी हिंदुस्थान असा करू नये तर  भारत असाच उल्लेख केला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले . 
मुलुंड पूर्व येथे आमदार सरदार तारसिंग यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या उद्यानात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे आणि संत थिरुवल्लूवर यांच्या  पुतळ्याचे उदघाटन आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकार जगन्नाथ मोरे यांच्या साप्ताहिक निर्भीडच्या दिवाळी अंकाचे आठवले यांच्या हस्ते प्रकाशन  करण्यात आले.
भाजपवर जरी हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा आरोप असला तरी त्यांनी हिंदुस्थान जनता पक्ष असे पक्षाचे नाव घेतलेले नाही तर भारतीय जनता पक्ष असे नाव  घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास साधत आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व धर्मांना  सोबत घेऊन न्याय देण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारत हा उल्लेख योग्य असून आपण विविध जाती धर्माचे लोक  भारतीय म्हणून एकत्र आहोत. ही राष्ट्रीय एकात्मता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झाली आहे. एकमेकांच्या धर्माचा आदर करून  आपण सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र आलो पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता मजबूत ठेवूया, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.