Breaking News

पर्यटनस्थळांची स्वच्छता ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी - जयकुमार रावल

मुंबई, दि. 02, ऑस्टोबर - स्वच्छतेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून स्वच्छता हीच सेवा अभियान राबविण्यात येत  आहे. या अभियानात लोकसहभागही महत्वाचा आहे. भाविकांनी तीर्थक्षेत्री व पर्यटकांनी पर्यटनस्थळी स्वच्छता पाळावी. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन  पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. पेडकाई देवी मंदिर, साळवे, ता. शिंदखेडा येथे आज सकाळी जिल्हा परिषद, धुळे, पंचायत समितीशिंदखेडा व ग्रामपंचायत  साळवे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हीच सेवा उपक्रम व पर्यटन पर्वानिमित्त पर्यटनस्थळाची स्वच्छता उपक्रम मंत्री श्री. रावल यांच्या उपस्थितीत राबविण्यात  आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी पेडकाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सत्तारसिंग गिरासे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती  नारायण पाटील, शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिवदे, सुदाम मोरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेची शपथ  घेतली.
मंत्री श्री. रावल म्हणाले, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळी येणारे भाविक व पर्यटकांनी घराप्रमाणेच या ठिकाणी स्वच्छता पाळली पाहिजे. स्वच्छता ठेवणे ही सुध्दा मातृभूमीची  सेवा करण्यासारखेच असून ती आपली जबाबदारीच आहे. ग्रामविकास विभागाने पुढाकार घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत परिवर्तन घडवून आणले पाहिजे. तीर्थक्षेत्री  फुलहार, नारळ, कचरा याची विल्हेवाट किंवा पुनर्वापराबाबत नियोजन केले पाहिजे. तसेच प्लास्टिकमुक्त तीर्थक्षेत्रासाठी मंदिर व्यवस्थापन व वनविभागाने पुढाकार  घेतला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेसाठी स्वच्छता हीच सेवा अभियान सुरू केले आहे. स्वच्छतेच्या पवित्र कामात  प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. तीर्थस्थळाच्या व्यवस्थापनांनी भाविकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबविली पाहिजे. त्यासाठी स्वच्छता हीच सेवा  असा संकल्प केला पाहिजे, असेही मंत्री श्री. रावल यांनी नमूद केले. परिसरातील वन समृध्द झाले पाहिजे. त्यासाठी वृक्षारोपण मोहीम राबविली पाहिजे. तसेच  पाण्याचे नियोजन करुन त्याचा काटकसरीने वापर करावा, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.