Breaking News

भाजप सरकारविरुद्ध काँग्रेसचा बुधवारी जनआक्रोश मोर्चा

सोलापूर, दि. 09, ऑक्टोबर - केंद्र, राज्य आणि महापालिकेतील भाजपच्या अन्यायकारक, चुकीच्या धोरणांमुळे गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. या  विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने हा जनतेचा आक्रोश मोर्चा बुधवारी दुपारी वाजता काढणार असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. मोर्चाला कॉँग्रेस  भवन येथून सुरुवात होईल. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येईल. तेथून तो महापालिकेकडे नेण्यात येणार आहे. महापालिकेसमोर त्याचे सभेत रूपांतर होईल.  आयुक्तांना निवेदन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मोर्चात फक्त कॉँग्रेस कार्यकर्ते नसून विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यापारी, उद्योजक,  कारखानदार आदींचा समावेश असणार आहे. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
विकास कामे केली म्हणून जनतेने मोदींना निवडून दिले नसून त्यांना जॅकपॉट लागला आहे. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही सुरू आहे. भाजप सरकार म्हणजे  भूलभुलय्या सरकार आहे. इतर पक्षाच्या नेत्यांना दमदाटी दिली जात आहे. भाजप पक्ष खोटारडा पक्ष आहे. स्मार्ट योजना फसवी आहे, अशी टीका यावेळी करण्यात  आली. याप्रसंगी कॉँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार दिलीप माने, नगरसेवक चेतन नरोटे यांची उपस्थिती होती.
मोर्चातील मुद्दे : पाणीपट्टी यूजर चार्जेस माफीचेे खोटे आश्‍वासन, स्मार्ट सिटी योजना दिशाभूल करणारी, अनियमित पाणीपुरवठा, गाळेधारकांवर टांगती तलवार,  स्वच्छतेचे तीन तेरा, परिवहनचे हाल, एनटीपीसीची दुहेरी जलवाहिनीचे काम अद्याप सुरू नाही, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, महापालिकेतील निधीचा बोजवारा, रमाई  आवास योजनेचा निधी पडून, मनपाच्या रोजंदारीचे कामगारांचे भविष्य, दोन मंत्र्यांच्या भांडणात शहराचा विकास खुंटला. महागाई, शेतकर्‍यांची कर्जमाफी, रेशनमध्ये  धान्य नाही, विडी कामगारांना रोख मजुरी नाही, जीएसटी ची अन्यायकारक टक्केवारी, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, उड्डाणपूल, दहशतवाद्यांच्या उच्छादामुळे सुरक्षा  धोक्यात.