Breaking News

वाम प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी सजग रहावे

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : ‘इडा पिडा टळो व बळीच राज्य येवो’ अशी मनोकोमना करणार्‍या बहुजनांच्या मनामनात आजही बळीराजाविषयी नितांत आदर आहे, असे मत  बळीराजाप्रेमींनी बळीराजा अभिवादनप्रसंगी व्यक्त केले. क्रांती थिएटर्सच्या सातारा शाखेचे अध्यक्ष अमर गायकवाड यांच्या पुढाकाराने सातार्‍यात बलिप्रतिपदेदिवशी बळीराजा अ भिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही येथील यशवंत उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रावण गायकवाड यांनी बळीराजाची वेशभूषा  घालून बळीराजा साकारला होता. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम बळीराजाचे पूजन करण्यात आले. 
यावेळी प्रा. जाधव म्हणाले, बळीराजाची आदर्श राज्य पध्दती, भारताची कृषी संस्कृती आणि त्यातील बळीराजाचे स्थान याबाबत विस्तृत माहिती सांगितली. कर्नाटकात साजरा होत  असलेला ओणम सण याची अभ्यासपूर्ण माहितीही त्यांनी दिली. तसेच बळीराजाचा आदर्श घेताना वामन प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी बहुजन समाजाने सजग होण्याचे मत मांडण्यात  आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन अमर गायकवाड म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बळीराजा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित  करण्यात येत आहे. आपल्या संस्कृतीचा मूळ पाया असलेल्या बळीराजाला अभिवादन करण्यासाठी समाजातील लोकांना वेळ नाही ही खरी शोकांतिका आहे.
यावेळी शाहीर प्रकाश फरांदे, संजय नीतनवरे, गौतम वाघमारे, मनोहर पवार, गौतम भोसले, अरुण पोळ, बळीराम जाधव, शाहीर रणदिवे यांच्यासह ओमकार तपासे यांनीही मनोगत  व्यक्त केले. कार्यक्रमास बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.