Breaking News

माहिम किल्ल्यावर साजरी झाली स्वच्छतेची विजयादशमी..!

पालघर, दि. 02, ऑक्टोबर - पूर्वी शिवकाळात पावसाळा संपल्यावर गडदुर्गांवर गवताची सफाई करुन किल्ल्यावर आनंदाचा जल्लोष करण्याची परंपरा होती.  कालांतराने किल्ल्याचे महत्त्व कमी झाल्यानंतर ही परंपरा कालबाह्य होऊ लागली होती. मात्र, आता पुन्हा स्वच्छतेच्या या अनोख्या उपक्रमास ऊर्जितावस्था देत  किल्ल्यावर दसरा सण साजरा करण्याची प्रथा महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर दुर्गप्रेमी संस्थांमार्फत आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. 
पालघर तालुक्यातील माकुणसार, केळवे, मथाणे, नगावे आणि पास्थळ इत्यादी गावातील तरुणांचा भरणा असलेल्या सह्याद्री मित्र या दुर्गसंवर्धनाचे कार्य करणार्‍या  संस्थेने दसरा निमित्ताने यावर्षी ’माहिम’ किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. गडावरील वाढलेले गवत, काटेरी झाडेझुडपे आणि पर्यटकांनी केलेला केरकचरा यांची  स्वच्छता करून, झेंडूची- पताक्यांची तोरणे, रांगोळीची सजावट, फुलांची आरास, इतिहास विषयक व्याख्यान आणि शस्त्र पूजनाने किल्ल्यावर  दसरादुर्गोत्सव साजरा  करण्यात आला.
सकाळच्या सत्रात गडावर स्वच्छता मोहीम पार पडली. तब्बल 4 तास चाललेल्या या श्रमदानासाठी परिसरातील 56 दुर्गप्रेमींची उपस्थिती होती. यावेळी माहिम  गावच्या सरपंच निलम राऊत, माकुणसारचे उपसरपंच अमोल मोहिते, माहिम किल्ल्याच्या संवर्धनासाठी झटणारे ज्येष्ठ नागरिक नंदकुमार चुरी, संजय पाटील, दिनेश  मोरे, मयूर वर्गट तसेच सह्याद्री मित्र परिवाराचे राकेश पाटील, निकेश पाटील, भुपेश म्हात्रे, गौरव राऊत, अरविंद पाटील, तुषार ठाकूर, सर्वेश पाटील, चिंतन सावे  आणि तमाम शिलेदार उपस्थित होते. तर दुपारच्या सत्रात गडावर शंभूराजांचा ज्वलंत इतिहास या विषयावर इतिहास अभ्यासक बाबासाहेब गुंजाळ यांनी व्याख्यान  दिले. इयत्ता 5 वीतील माकुणसार येथील तनिष्का पाटील या विद्यार्थीनीने आपल्या दणदणीत आवाजात शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला. तसेच मायखोप  येथील योगेश भोईर याने ’संभाजी महाराज’ असा कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कलाविष्कारासाठी हिरेंद्र भोईर, आकाश पाटील, गौरव  पाटील, रुपेश पाटील यांनी उत्तम साथ दिली. त्याचप्रमाणे परिसरातील तरुणींच्या पारंपरिक वेशभूषेमुळे गडावर एकंदर शिवशाही अवतरल्याचे चित्र दिसत होते.  पालघर परिसरातील किल्ल्यांचा ज्ञात- अज्ञात इतिहास आणि दुर्गसंवर्धन चळवळीची गरज यावेळी सह्याद्री मित्र परिवाराचे अध्यक्ष दिपक पाटील यांनी व्यक्त केली.