Breaking News

एसटी सुरू झाल्याने भाऊबीजेसाठी जाणा-या प्रवाशांना दिलासा

सातारा, दि. 22, ऑक्टोबर - गेल्या पाच दिवसापासून एसटी कर्मचा-यांचा सुरू असलेला संप अखेर मिटला आहे. आज (शनिवारी) सकाळी सातारा  बसस्थानकातून एसटी बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. संप मागे घेतल्याचे समजताच प्रवाशांनी बसस्थानकात गर्दी केल्याचे चित्र  दिसत आहे. 
(शुक्रवारी) उच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर रात्री उशिरा कर्मचा-यांची बैठक झाली. पहाटेपर्यंत त्यांची चर्चा सुरू होती. बैठकीत कर्मचा-यांनी  आजपासून (शनिवार) कामावर रुजू होण्याचे निश्‍चित झाले. कर्मचा-यांच्या या निर्णयानुसार शनिवारी पहाटे सहा वाजता चालक, वाहक बसस्थानकामध्ये  आले आणि त्यांनी सात वाजल्यापासून एसटी सुरू केली. आज भाउबीजेसाठी अनेक भाउरायांनी या एसटीतूनच आपल्या बहिणीकडे जाणे पसंत केले.  दरम्यान सातारा शहर बसवाहतूक मात्र दुपारी उशीरा पर्यंत सुरु झाली नसल्याने राजवाडा बसस्थानकात प्रवासी येत होते.मात्र एसटी येत नसल्याने  अनेकांनी पुन्हा शेअर रिक्शा पकडणेच पर्याय मानले. दरम्यान लाल डबा म्हणून हिणवली गेलेली ही एसटी मुख्य रस्त्यावरुन धावताना आज काही नवी  नवलाई वाटत होती. अनेक जण अरे सरु झाली म्हणत हात दाखवतच या एसटीचे स्वागत करत होते.