Breaking News

सण, उत्सवानिमित्त खाद्य नमुने तपासणीसाठी अन्न सुरक्षा अधिकार्‍यांचे पथक सज्ज

सांगली, दि. 13, ऑक्टोबर - अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सण आणि उत्सवानिमित्त  खाद्य नमुने व तपासणीकरिता चार अन्न सुरक्षा अधिकार्‍यांचे पथक तयार करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यामधून खबरदारीचा उपाय म्हणून खव्याचे 4, खाद्यतेलाचे 9, मिठाईचे,  दुधाचे 12 व इतर अन्न पदार्थांचे 17 नमुने तपासणीकरीता घेण्यात आले आहेत. या नमुन्यांचे विश्‍लेषण अहवाल आल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कारवाई क रण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) एस. बी. कोडगीरे यांनी दिली.
कोडगीरे म्हणाले, अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयातर्फे एप्रिल 2017 पासून एकूण 169 खाद्यपदार्थांचे नमुने विश्‍लेषणासाठी घेण्यात आले आहेत. यापैकी 37 अन्न नमुने  कमी दर्जाचे व 8 अन्न नमुने असुरक्षित आढळून आले आहेत. कमी दर्जाच्या अन्न नमुन्याप्रकरणी तडजोड व न्यायनिर्णयकरिता प्रकरण दाखल केले असून या प्रकरणी एकूण 8  लाख 33 हजार 100 रूपये इतका दंड आकारण्यात आला आहे. तसेच या कालावधीत जप्ती धाडी टाकून 16 हजार 435 लिटर दुधाचा व अपमिश्रकाचा 6 लाख 32 हजार 339  रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. खाद्यतेलाचा 3 लाख 72 हजार 798 रूपये किंमतीचा 3 हजार 400 किलोचा साठा व इतर अन्न पदार्थांचा 7 लाख 3 हजार  133 रूपये किंमतीचा 9 हजार 392 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात तयार फराळ स्टॉलची तपासणी व नमुने घेण्याची मोहिम अविरतपणे चालू आहे. ग्राहकांनी अन्न पदार्थ खरेदी करतेवेळी बिलाव्दारे व परवानाधारक, नोंदणीधारक ाकडून खरेदी करावे. अन्न पदार्थ खरेदी करतेवेळी अन्नपदार्थांच्या लेबलवर उत्पादकाचा पत्ता, बॅच नं., पॅकींग दिनांक इत्यादी बाबी तपासूनच खरेदी करावी. खाद्य पदार्थ करतेवेळी  भेसळीबाबत काही संशय आल्यास अन्न व औषध प्रशासन, सांगली यांना कळवावे अथवा प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करावा, असे आवाहन कोडगीरे  यांनी केले आहे.