Breaking News

नेर्लेत 19 लाखांची गोवामेड दारू जप्त

सांगली, दि. 13, ऑक्टोबर - गोवा राज्यातून विदेशी दारूची अलिशान वाहनातून तस्करी करणा-या पुणे जिल्ह्या महिलेसह दोघांना गुरूवारी पहाटेच्या सुमारास नेर्ले (ता. वाळवा)  येथे थरारक पाठलाग करून पकडण्यात आले. ही कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या संयुक्त भरारी पथकाने केली. या दोघांकडून  विदेशी दारूचा साठा व अलिशान मोटार असा एकूण 19 लाख 51 हजार 200 रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
नेर्ले येथून गोवा मेड विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय आयुक्त श्रीमती संगीता दरेकर यांना मिळाली होती. या माहिती  आधारे श्रीमती संगीता दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक संजय वाडेकर, अतुल पाटील, जी. पी. थोरात, युवराज शिंदे, सुनील परळे, अमित तांबट,  सुहास वरूटे, अमर पाटील, सुशांत बनसोडे, श्रीमती शीतल जिमगे, संतोष बिराजदार, श्रीपाद पाटील व विक्रम परळीकर यांच्या पथकाने नेर्ले गाव परिसरात सापळा रचला होता.
गुरूवारी पहाटेच्या सुमारास या पथकाला (क्रमांक एमएच 42- एच 9) ही चारचाकी भरधाव वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले. या पथकातील कर्मचा-यांनी या चारचाकी  वाहनाला थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने चारचाकी अधिक भरधाव वेगाने पळवली. अखेर या पथकाने पाठलाग करून काही अंतरावर ही चारचाकी पकडली. या चारचाकी  वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचा 60 बॉक्स विदेशी दारूसाठा मिळून आला.
या विदेशी दारू तस्करीप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून विदेशी दारूसाठ्यासह अलिशान  चारचाकी उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली असून याची किंमत 19 लाख 51 हजार 200 रूपये इतकी आहे. अटक केलेले हे दोघेही पुणे जिल्ह्यातील असून पुढील तपासात  अडथळा येऊ नये, यासाठी या दोघांचीही नावे सांगता येणार नसल्याचे श्रीमती संगिता दरेकर यांनी सांगितले.