Breaking News

राजकारणातील कुलटागीरी

दि. 07, ऑक्टोबर - समाजात वेश्यावृत्तीला निषिध्द मानले जाते.वास्तविक या मार्गाला कुणीही स्वखुशीने जात नाही. मजबूरी या मार्गावर घेऊन जाते.तरीही शब्दाशी प्रामाणिक राहण्याचे प्रमाण याच व्यवसायात मिळते.तरीही समाज या प्रवृतीला उघडपणे नाकारतो,बंद खोलीत त्याचा उपभोग तेव्हढ्याच चवीने घेतो.असा हा वेश्याप्रवृतीला नाकारणारा समाज त्याचवेळी वेश्यावृत्तीपेक्षाही खालची पातळी गाठलेल्या आजच्या राजकारणाला माञ डोक्यावर घेऊन नाचतो.यातच राजकारणाचे नैतिक मुल्य रसातळाला जाण्यामागचे रहस्य दडले आहे.
आज आपल्या भोवती दिसणारी परिस्थिती भयानक आहे.सर्वसामान्य माणसाचा निती मुल्यांशी फारकत घेतलेल्या राजकारणाशी थेट संबंध येत नसला तरी या मंडळींच्या राजकीय भुमिकेमुळे एकूण व्यवस्थेवर होणारा परिणाम सामान्य जनतेचे हित बाधीत करतो.म्हणून राजकारणातील कुलटागीरी भुमिकेला रोखणे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे.
विद्यमान राजकीय परिस्थितीत अशा कुलटा प्रवृतीने राजकारण दुषित केले आहे.केवळ महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राज्यात महायुतीची सत्ता आहे.समान वैचारीक बैठक म्हणून भाजपा,शिवसेना,स्वाभीमानी शेतकरी संघटना,राष्ट्रीय समाज पक्ष अशा विविध राजकीय पक्षांनी एकञ येऊन सत्तेची मोट बांधली.प्रत्यक्षात या राजकीय पक्षांचा सत्तेची उब मिळवणे हाच एक कलमी समान कार्यक्रम आणि  तीच त्यांची समान वैचारीक बैठक  असल्याचे गेल्या तीन वर्षात घटक पक्षांमध्ये टोकाला गेलेले मतभेद सांगतात.भाजप नंतर सत्तेत मोठा वाटा घेतलेल्या शिवसेनेचे सरकारमधील भाजपाच्या धोरणाविरूध्द सुरू असलेले अरण्यरूदन राजकारणाची निती मुल्ये किती घसरली आहेत याचे उत्तम उदाहरण आहे.तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना या पलिकडे जाऊन आजच्या राजकारण्यांनी नैतिकतेचा सत्तेच्या बाजारात लिलाव केला आहे.शिवसेनेच्या बाबतीत बोलायचे झाले तर विचार आणि आचारांचे अधिष्ठान सत्तेच्या दरबारात गहाण ठेवून हा पक्ष जनहिताच्या नैतिकतेचे धडे देऊ पहात आहे.
सरकारमध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधीत्व करणारे सदाभाऊ खोत यांनी सत्तेसाठी ध्येयधोरणांशी अन् जनतेशी केलेला द्रोह कुलटागीरीपेक्षा कमी नाही.
अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे झाले तर नारायण राणे यांच्या भुमिकेचे देता येईल काल परवापर्यत हा नेता भाजपाला उठता बसता शिव्या घालत होता.माञ सत्तेचे आकर्षण भल्याभल्या ध्येयवाद्यांना तडजोड करण्यास भाग पाडते.तिथे नारायण राणे यांच्या सत्तेसाठी लाचार माणसाने अमित शहांचे तळवे चाटणे स्वाभाविक होते.प्रश्‍न फक्त राणे यांच्या चाटूगीरीचा नाही तर ज्या भरोशावर या प्रवृत्ती लाचार बनूनही मुजोरी करतात त्या पाठीराख्यांच्या बदलणार्या भुमिकेचा आहे.राणे यांना थेट पक्ष प्रवेश न देता वेगळा पक्ष काढण्यास मजबूर केल्या नंतर राज्यमंञीमंडळात त्यांचे पुनर्वसन करण्याचा अट्टाहास भाजपाचे श्रेष्ठी करीत असल्याची बातमी आहे.अट्टाहास म्हणण्याचे कारण असे की,राणे विधान परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.काँग्रेस सोडल्या नंतर त्यांना विप सदस्यत्वाचा राजीनामा देणे क्रमप्राप्त आहे.मंञीमंडळात त्यांना सहभागी करून घ्यायचे म्हणजे विधीमंडळ सदस्यत्वासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार .विधानसभेत प्रवेश शक्य नाही.विधानपरिषदेत भाजपाचा सहयोगी आमदार म्हणून राणे यांचा मार्ग मोकळा करण्याच्या हालचाली सुरू आहेत.माञ हा मार्गही वाटतो तितका धोपट नक्कीच नाही.भाजपकडे स्वतःचे 122 आमदार आहेत,तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि राणे यांची कट्टर विरोधक शिवसेना यांचे बलाबल 146 पर्यंत पोहचते.उरलेले 20 आमदार भाजपाच्या गळाला लागले तरी राणे यांचा सरळ पराभव अटळ आहे.याचाच अर्थ राणे किंवा भाजपात दिसत असलेल्या आत्मविश्‍वासामागे राजकारणातील कुलटागीरीचे बळ स्पष्ट दिसते.म्हणजे काय तर शिवसेना नितीमत्ता म्हणून नव्हे तर कट्टर विरोधक म्हणून राणेंना सहकार्य करणे शक्य नाही.काँग्रेसचा विषय संपलेला आहे.मग उरली फक्त राष्ट्रवादी.राष्ट्रवादी सोबत येईल असा भाजपसह राणेंनाही विश्‍वास आहे.राष्ट्रवादीचे या निवडणूकीत भाजपासोबत जाणे राजकीय कुलटागीरीच म्हणायला हवी.अर्थात राणे यांच्यासमोर विधानसभेत जाण्याचा  एक मार्ग आहे.मुलाचा राजीनामा घेऊन जनमताचा कौल ते मागू शकतात.माञ नैतिक मुल्य घसरलेल्या आजच्या राजकारणात  राणे यांच्याकडून ही अपेक्षा धरणे गैरच.