Breaking News

पंकजा मुंडे विरूध्द नामदेव शास्त्री वाद आता गावागावापर्यंत

औरंगाबाद, दि. 22, ऑक्टोबर - मंत्री पंकजा मुंडे विरूध्द भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वाद आता गावागावापर्यंत पोहोंचला असून एका  गावात चक्क नामदेव शास्त्री यांच्या किर्तनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.
औंरंगाबाद शहरापासून जवळच असलेल्या मौजे भालगाव येथे 21 ऑक्टोबरपासून हरिनाम सप्ताह सुरू होत आहे.त्यात 28 तारखेला महंत नामदेवशास्त्री  यांच्या किर्तनाचे आयोजन केले आहे. या किर्तनाला भालगावकर ग्रामस्थांकडून विरोध करण्यात आला आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर  गावातील वातावरण दूषित होण्यास शास्त्री यांचे किर्तन कारणीभूत ठरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या किर्तनावर बंदी घालावी, असा ठराव सर्व  ग्रामस्थांमार्फत घेण्यात आला आहे. या किर्तनादरम्यान, काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल, असा इशारा  ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.आता पोलिस यावर काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.