Breaking News

फेरीवाल्यांच्या विरोधात दादर परिसरात मनसेचा मूक मोर्चा

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - फेरीवाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज दादर परिसरात तोंडावर पट्ट्या बांधून आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी 30 -40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये माजी आमदार नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार, महिला नेत्या रिटा गुप्ता, माजी  नगरसेविका स्नेहल जाधव यांचा समावेश होता.
तर, लोअर परळ परिसरातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी झेंडा मोर्चा काढला. मोर्च्याच्या वेळी या परिसरात एकही फेरीवाला दिसला नाही. पण त्यांचे सामान मात्र बांधलेल्या स्वरूपात  रस्त्यांवर दिसत होते. फेरीवाल्यांवर अंकुश ठेवणे हे आमचे काम नाही. पण तरी आम्हाला ते करावे लागते. आज आम्ही मोर्चा काढणार म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन हा परिसर फे रीवाला मुक्त केला तसाच कायम ठेवता येऊ शकतो. परिसर फेरीवाला मुक्त ठेवला जावा एवढीच आमची मागणी आहे, असे मत माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी व्यक्त केले.