Breaking News

सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन बालके जखमी

सांगली, दि. 09, ऑक्टोबर - सांगली शहरातील त्रिमुर्ती कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन बालके जखमी झाली आहेत. वारंवार मागणी  करूनही या भागातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या चालढकलपणाविरोधात नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया  उमटली. इतकी गंभीर घटना घडूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांचा अपवाद वगळता महापालिकेचा कोणताही जबाबदार अधिकारी अथवा  लोकप्रतिनिधी या भागात ङ्गिरकला नाही. 
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यात शुभम सिध्दराम बिराजदार (वय चार वर्षे), आरोही बाबासाहेब सांगोलकर (वय तीन वर्षे) व विराज सुनील रेड्डी (वय  सहा वर्षे) या तीन बालकांचा समावेश आहे. या तीनही बालकांवर वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांच्यावर शनिवारी  रात्रीच्या सुमारास या परिसरातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता.
मिरज शहरातील उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक बालक गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा असाच प्रकार सांगली शहरातील  रस्त्यालगतच्या पोळ मळा परिसरातील त्रिमुर्ती कॉलनी या उपनगरात घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रिमुर्ती कॉलनी परिसरातील श्री  स्वामी समर्थ मंदिरासमोरील खुल्या क्रीडांगणात सायंकाळच्या सुमारास नेहमी मुलांची खेळण्यासाठी गर्दी असते.
शनिवारी सायंकाळीही अशीच गर्दी मंदिर परिसरात होती. खेळून झाल्यानंतर ही मुले घरी परतत असताना भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या शरिराचे  लचकेतोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दक्ष नागरिकांनी धाव घेऊन त्या कुत्र्यांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला. काही संतप्त नागरिकांनी त्या कुत्र्यांचा  पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो असफ ठरला. रविवारी सकाळीही पुन्हा ही भटकी कुत्री या परिसरात फिरताना आढळल्याने संतप्त नागरिकांच्या संयमाचा  बांध सुटला व काहीजणांनी त्यातील एका कुत्र्यास ठार मारले. संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधितांकडून  कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले.
अखेर काही ज्येष्ठ नागरिकांनी ही घटना दिग्विजय सूर्यवंशी यांच्या कानी घातली. एका दहन विधीसाठी बाहेरगावी गेलेल्या दिग्विजय सूर्यवंशी यांनी तात्काळ या  घटनेचे गांभीर्य ओळखून डॉग व्हॅनवरील कर्मचा-यांना घटनास्थळी पाठविले. डॉग व्हॅनवरील सिध्दार्थ कांबळे व अन्य कर्मचार्यांनीही तातडीने या भागात येऊन चार ते  पाच भटक्या कुत्र्यांना पकडले. त्यावेळी काही संतप्त नागरिकांनी या डॉग व्हॅनवरील कर्मचार्यांनाही चांगलेच फैलावर घेतले. मात्र एक- दोन दिवसात या भागात मोहिम  राबवून हा परिसर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करण्याची हमी देऊन त्या कर्मचार्यांनी आपली सुटका करून घेतली.