Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील धान्य दुकानांमध्ये बँकिंगची सुविधा

रत्नागिरी, दि. 29, ऑक्टोबर - जिल्ह्यातील रास्त दराच्या धान्य दुकानांच्या डिजिटायझेशनचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 1270 रेशन दुकानांत कॅशलेस  व्यवहारासाठी पीओएस (पॉइंट ऑफ सेल) प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. आता या दुकानांना सेवा केंद्राचा दर्जा देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बँकिंगच्या सुविधा  उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
रास्त दराच्या धान्य दुकानदारांनी संप मागे घेतल्यानंतर तालुकास्तरावर पीओएस मशीन आणि अन्य सुविधांबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व दुकानांत  पीओएस कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील 13 रेशन दुकानांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. या दुकानांनाही पीओएसच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. आता या  दुकानांतून पहिल्या टप्प्यात बँकिंगच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. दुस-या टप्प्यात या दुकानातून अन्य 13 प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये बिल भरणा कें द्र, विमा हप्ता भरणे आदी सुविधांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील शिधा वितरणात सुधारणा करण्यासाठी आता रेशन दुकाने जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता बचतगटांना चालविण्यास देण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील 297  बचतगटांनी प्रतिसाद दिला असून या गटापैकी महिला संचालित गटांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.