Breaking News

’स्पंदन फाऊंडेशन’ ची वंचित व अनाथ मुलांसोबत दिवाळी

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - वंचित, अनाथ आणि मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा हृदयाची गरज जास्त असते. आपुलकी, प्रेम आणि  कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. गुरू ठाकूरांच्या या कवितेप्रमाणे आपण जर एक दिवा वंचितांच्या दारी लावला तर ख-या अर्थाने  सगळयांच्याच घरी दिवाळी साजरी होईल. याच जाणीवेतून प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबई च्या ’स्पंदन फाऊंडेशन’ ने नुकताच मालाड-मालवणी च्या ’स्नेह  सागर ट्रस्ट’ आणि ’श्रम यश फाऊंडेशन’ मधील वंचितांसोबत आणि अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. ह्या संस्थाना स्पंदन तर्फे शिलाई मशीन,  पाणी शुध्द करणारे यंत्र, पंखे भेट म्हणून देण्यात आले. 
स्पंदनच्या सदस्यांनी अनाथ मुलांना फराळाचे वाटप करुन त्यांच्यासोबत फराळाचा आस्वादही घेतला. स्पंदन फाऊंडेशन मुंबई सामाजिक आणि शैक्षणिक  क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. या मुलांसोबत दिवाळी साजरी करताना खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी झाल्याचे समाधान प्रत्येकाला अनुभवायला मिळाले.
दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, दागिने आणि भरपूर मिठाई असे चित्र लहान मुलांच्या डोळ्यासमोर उभे राहते. दिवाळीची खरेदी हा जणू कौटुंबिक सोहळाच  असो. अनाथ मुलींना मात्र हे आनंदाचे क्षण अनुभवायला मिळत नाहीत. हा उपक्रम साजरा करताना बालकांच्या चेहर्‍यावरील फुललेले हास्य अंतःकरण  दाटून आणणारे होते. वंचितांच्या अंधारमय जीवनात एक आनंदाचा दिवा लावल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होते. अशा पद्धतीने स्पंदन  फाऊंडेशन मुंबईने आगळी वेगळी दिवाळी साजरी केली.’स्नेह सागर ट्रस्ट’ आणि ’श्रम यश फाऊंडेशन’ ह्या संस्थांच्या वतीने स्पंदनचे आभार मानण्यात  आले. भविष्यात स्पंदनतर्फे अनेकविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस आहे.