Breaking News

सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवरील फटाके विक्रीचा परवाना तातडीने रद्द करण्याची मागणी

अहमदनगर, दि. 11, ऑक्टोबर - नगर शहरातील सावेडी उप नगर परिसरात जॉगिंग ट्रॅक असणा-या मेजर दिनूभाऊ कुलकर्णी मैदानावर  फटाके विक्रीसाठी स्टॉल्स लावण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र हे मैदान संपूर्णत: नागरी वस्तीमध्ये असल्याचे काही दुर्घटना  घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.या पार्श्‍वभूमीवर स्वयंसेवी संस्था महासंघाने जिल्हाधिकारी अभय महाजन व जिल्हा पोलीस अधिक्षक  रंजनकुमार शर्मा यांना निवेदन सादर केले असून फटाके विक्रीचा परवाना तातडीने रद्द करावा,अशी मागणी केली आहे.या ठिकाणी काही  दुर्घटना घडली तर थेट प्रशासनालाच जबाबदार धरण्याचा इशारा ही संघटनेने आपल्या निवेदनात दिला आहे. तसेच या निवेदनाची प्रत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सावेडी परिसरात असणा-या या मैदानाच्या चारही बाजुंनी मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असतांनाही येथे फटाके  विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.मागील वर्षी औरंगाबाद मध्ये अशाच प्रकारे नागरी वस्तीत असणा-या फटाके विक्रीच्या दुकानांना  आग लागण्याची घटना घडली होती.त्यामुळे नगरमध्ये देखील नागरी वस्तीत असणा-या या फटाके विक्रीच्या दुकानांमुळे अशाच प्रकारची  दुर्घटना होऊ शकते.लोक वस्तीच्या मध्यभागी असणा-या या ठिकाणी दुर्घटना घडल्यास महापालिका,पोलीस व महसूल यंत्रणा यांनाच थेट  जबाबदार धरण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.तसेच या निवेदनाची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी देखील फटाके विक्रीचा  परवाना रद्द करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.वास्तविक पाहाता जॉगिंग ट्रॅक परिसरातील मेजर दिनूभाऊ कुलकर्णी मैदान के क्रीडांगण  असूनही अनेक वेळा महापालिकेकडून या मैदानाचा व्यवसायिक उपक्रमांसाठी वापर केला जातो.मागील वर्षभरापासून सातत्याने फटाके  विक्रीला विरोध करूनही येथे फटाके विक्रीला परवाना देण्यात आला असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी व संबंधितांवर कठोर कारवाई  करावी,अशी मागणी स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने केली आहे.अजय वाबळे,प्रा.पी.डी.ऋषी,विशाल अहिरे,संतोष धर्माधिकारी,गौरव  दुशिंग,सुरज सोसे,नाना बारसे,प्रा.राजेंद्र पाटणी,राकेश चितळे,शाहीद शेख आदि यावेळी उपस्थित होते.