Breaking News

महापौर चषक कुस्ती स्पर्धेसाठी 76 लाखांचा खर्च

पुणे, दि. 05, ऑक्टोबर - पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरविणार आहे. त्यासाठी येणा-या 75 लाख 89 हजार रुपये  खर्चास स्थायी समितीने  (बुधवारी) आयत्यावेळी मंजूरी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने, इंडिया व्रेस्टलिंग असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य  कुस्तीगीर परिषद पुणे व पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघ चिंचवड यांच्या मान्यतेने यांच्या सहकार्याने महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे. मोशी, बो-हाडेवाडी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे ऑक्टोबर महिन्यात महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत  146 खेळाडू सहभागी होणार आहेत.पंच, पदाधिकारी मानधन व प्रवास खर्च 50 हजार रुपये, लाल माती 20 हजार रुपये, पंचांचे जेवन, हलगीवादन, निवेदक  मानधन यासाठी एक लाख 20 हजार रुपये, रोख बक्षिसांसाठी 52 लाख 84 हजार रुपये, चांदीची गदा, मानचिन्ह, विजेता, उपविजेता खेळाडू यांना बक्षिस, पंचाचा  सत्कार, मानचिन्ह देण्यासाठी तीन लाख रुपये, पाण्याच्या टँकरसाठी 20 हजार रुपये, निमंत्रणपत्रिका खर्च 10 हजार रुपये, चहापान व अल्पोपआहारासाठी  येणा-या 20 हजार रुपये, स्पर्धेचे फलक छापण्यासाठी चार लाख रुपये, हार, पुष्पगुच्छ व नारळ यासाठी 15 हजार रुपये, क्रीडा संघटना यांना द्यावयाची स्पर्धा  मान्यता फीसाठी येणा-या दोन लाख 10 हजार रुपये, पत्रकार परिषदेसाठी 10 हजार रुपये, छायाचित्रे, व्हिडीओ, शुटींग व प्रसिद्धीसाठी एक लाख रुपये, छत्रपती  शिवाजी महाराज व बजरंग बलीची भव्य मूर्ती भाड्याने आणण्यासाठी 40 हजार रुपये, फेट्यांसाठी 20 हजार रुपये, किरकोळ खर्च, स्टेशनरीसाठी 20 हजार रुपये,  जागेचे भाडे 50 हजार रुपये अशा स्पर्धेसाठी 66 लाख 89 हजार रुपये खर्च येणार आहे. या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मंजुरी दिली.