Breaking News

पिंपरी पालिकेतर्फे ’वन्यजीव’ महोत्सव

पुणे, दि. 05, ऑक्टोबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 4 ते 8 ऑक्टोबर दरम्यान ’वन्यजीव’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त वन्यजीव  विषयक विविध व्याख्यान, ’फिल्म शो’ तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. चिंचवड, सभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयात 4  ते 8 ऑक्टोबर दरम्यान हे सर्व कार्यक्रम होणार आहेत.दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर या काळात जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड  महापालिकेचे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय हे शहरातील एकमेव वन्यजीव विषयक केंद्र कार्यरत असल्याने दरवर्षी याठिकाणी वन्यजीव महोत्सव  आयोजित करण्यात येत आहे. वन्यजीव सप्ताहानिमित्त प्राणिसंग्रहालयामध्ये शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन तसेच वन्यजीव  विषयक विषयांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आणि फिल्मशो महोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आली आहेत. महोत्सवातील स्पर्धांचा  निकाल तसेच बक्षिसवितरण समारंभ पालिकेच्या वर्धापनदीनाच्या कार्यक्रमांतर्गत होणार आहे.बुधवार (दि.4) ते शुक्रवार (दि.6) तीन दिवस दररोज सायंकाळी चार ते  सहा या वेळेत वन्यजीव विषयक व्याख्यान / ’फिल्म शो’चे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. शनिवारी (दि.7) सकाळी साडेदहा ते  दुपारी दीड यावेळेत चित्रकला स्पर्धा होणार आहे. पहिली ते चौथी ’अ’ गट, पाचवी ते सातवी ’ब’ गट आणि आठवी ते दहावी ’क’ अशा तीन गटात ही स्पर्धा  होणार आहे. रविवारी (दि.8) सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन यावेळेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भित्तीचित्र स्पर्धा होणार आहे.