Breaking News

’मनसे’ तुन फुटलेले 6 नगरसेवक पक्षातच; शिवसेनेचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - मनसेतून शिवसेनेत आलेले सहा नगरसेवकांपैकी काही जण पुन्हा मनसे नेत्यांच्या संपर्कात असल्याची खोटी वृत्ते प्रसारित केली जात आहेत. जनतेने  अशा वृत्तांवर विश्‍वास ठेऊ नये. आम्ही सर्व सहा नगरसेवक शिवसेनेतच आहोत आणि रहाणार, असा निर्धार शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांच्यासह सहा नगरसेवकांनी प्र सिद्धीपत्रकाद्वारे आज व्यक्त केला. आमची बदनामी करण्याचे षडयंत्र करत आहेत. जनतेने अशा वृत्ते किंवा अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
13 ऑक्टोबर रोजी मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये दिलीप लांडे, अश्‍विनी माटेकर, परमेश्‍वर कदम, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना  भालेराव यांचा समावेश होता. आता यापैकी 4 नगरसेवक पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. या नगरसेवकांशी संपर्क झाला असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. यातील  दोघांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चाही केली असल्याचा दावा मनसेच्या काही नेत्यांकडून केल्याच्या बातम्या आज दिवसभरात प्रसिद्ध झाल्या. या पार्श्‍वभूमीवर  शिवसेनेकडून हे प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा करण्यात आला.