Breaking News

कापूस उत्पादकांना गुजरातप्रमाणे 500 रुपये प्रति क्विंटल बोनस द्या - किशोर तिवारी

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमधील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देत गुजरातमधील भाजप सरकारने 500 रुपये प्रति क्विंटल  बोनस देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता राज्यातही हाच निर्णय जाहीर करावा, अशी आग्रही मागणी कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वाभिमान मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
500 रुपये प्रति क्विंटल बोनस दिल्याने शेतकर्‍यांना हमीभाव अधिक बोनस असा 4 हजार 850 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार असल्याने विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहू  शेतकर्‍यांना मोठा आधार मिळणार आहे. मागील वर्षी विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांनी सोयाबीन व तुरीचे विक्रमी उत्पादन केल्यांनतर व्यापार्‍यांनी भाव पाडल्यामुळे  हमीभावापेक्षा कमी भावात विकले गेले. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीला तोंड दिल्यानंतर यावर्षी विदर्भ व मराठवाड्यातील 40 लाख शेतकर्‍यांनी सुमारे 50 लाख हेक्टरमध्ये क ापसाची या नगदी पिकाची पेरणी केली. दिवाळीला अनेक ठिकाणी खरेदीचा मुहूर्त झाल्याच्या वार्ता प्रकाशित झाल्या आहेत मात्र सुरवातीला खरेदीचा भाव शेतकर्‍यांच्या आशेवर  पाणी भेरणारा आहे कारण मागील दोन वर्षांपासून सरासरी पाच हजार रुपये क्विंटल असणारा कापुस या वर्षी जागतीक मंदीचा नावावर व्यापार्‍यांनी सरासरी चार हजार रुपये क्विंटल  भावात खरेदी करण्यास सुरुवात केल्याने राज्य सरकारने केंद्राच्या सीसीआय व फेडरेशनची कापूस खरेदी तात्काळ सुरु करावी, अशी विनंती तिवारी यांनी केली आहे.