Breaking News

132 दुचाकी वाहने चोरल्याची कबुली

पुणे, दि. 26, ऑक्टोबर - वाहनचोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी नेमलेल्या पोलीस पथकातील कर्मचारी एका दुचाकीस्वाराला हटकतात. पोलिसी खाक्या दाखवून त्याच्यावर  प्रश्‍नांचा भडीमार करतात आणि अचानक एक सराईत दुचाकी वाहनचोर पोलिसांच्या जाळ्यात सापडतो. त्याच्याकडे कसून चौकशी करताच त्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि  आसपासच्या भागातील एक-दोन नव्हे तर तब्बल 132 दुचाकी वाहने चोरल्याचे कबुल केल्यानंतर पोलिसही चक्रावून जातात. संतोष शिवराम घारे (वय 33, रा. ओझर्डे, ता.  मावळ,जि. पुणे ) असे या सराईत दुचाकी वाहन चोराचे नाव आहे.
शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट 2 कडून हिंजवडी वाकड येथे एक , सिहंगड वारजे परिसरात  एक आणि भारती विद्यापीठ दत्तवाडी येथे एक अशी तीन पथके नियुक्त करण्यात आली होती. वाकड हिंजवडी पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक तांबे आणि पोलीस शिपाई जां गिलवाड याना एक संशयित इसम मोटारसायकलवरून जाताना दिसला. त्यांनी त्याला हटकले आणि त्याच्याकडे मोटारसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने  उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.पोलिसांचा संशय बळावताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील गाडीचा चासी क्र इंजिन क्रमांकाची माहिती प्राप्त केली असता  सदर गाडी चोरीची असून या गाडी हरविल्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मग आपला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गाडी  चोरल्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या 132 ठिकाणी दुचाकी वाहने चोरल्याचे सांगितल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.
या आरोपीच्या विरोधात 2003 मध्ये 6 गुन्हे दाखल असून आरोपी हा बांधकामाच्या सेंटरिंगची कामे करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. पैशाची गरज लागल्यास बनावट  चावीने दुचाकी चोरून तीच गाडी पैशाची गरज आहे असे सांगून बांधकामावरील इतर मजुरांना 5-7 हजारांना गाडी विकत असे. गाडीची कागदपत्रे नंतर देतो असे सांगून काही  दिवसांनी बांधकामाची जागा सोडून अन्य ठिकाणी कामाला जात असे. त्याठिकाणी पुन्हा वरीलप्रमाणेच हकीकत सांगून चोरीच्या गाड्या विकत असे. ओळखीच्या व्यक्तींनाही त्याने  गाड्या विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी त्वरित तपास करीत चोरीचे वाहन खरेदी केलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन 64 गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीने हिंजवडी - 6, शिवाजीनगर - 4, वाकड -3, डेक्क न-2, हडपसर- 2, निगडी-2, भारती विद्यापीठ-1, पिंपरी-1, सांगावी-1, तळेगाव दाभाडे-7, कामशेत-3, देहूरोड-1, वडगाव मावळ - 1, खंडाळा-1 आणि उदगीर -1 या  पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे एकूण 40 वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित गुन्ह्याचा तपास सुरु आहे. त्याच्याकडून 25 लाख 30 हजार रुपये किमतीची 64 वाहने  हस्तगत करण्यात आले असून आरोपीला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.