Breaking News

जनावरांच्या उपचारासाठी 389 सुसज्ज मोबाईल व्हॅन - महादेव जानकर

लातूर, दि. 17, ऑक्टोबर - जनावरांच्या जागेवर जाऊन उपचार करता यावेत याकरिता राज्य शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला अत्याधुनिक पशुवैद्यकीय सोयी-सुविधांनी सज्ज  असलेल्या 389 मोबाईल व्हॅन मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
उदगीर तालुक्यातील मौजे हंडरगुळी येथील पशुबाजाराच्या उद्घाटन प्रसंगी श्री.जानकर बोलत होते. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री.जानकर म्हणाले की, पशुपालकांच्या आजारी  जनावरांच्या उपचारासाठी एका कॉलवर पशुवैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेली व्हॅन पशुपालकांच्या घरी जाऊन आजारी जनावरांवर उपचार करणार आहे. त्यामुळे पशुपालकांना  पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्या पशुंना घेऊन न जाता जागेवरच उपचार मिळणार असल्याचे त्यांचा वेळ व त्रास वाचणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पशुवैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेली मोबाईल व्हॅनची किंमत 24 लाख रुपये इतकी असून तेलंगणा राज्यातील मोबाईल व्हॅनपेक्षाही अधिक दर्जेदार सुविधा ह्या व्हॅनमध्ये उपलब्ध क रण्यात येणार आहेत, असे श्री.जानकर यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रीय दुग्धविकास बोर्डच्या प्रकल्पांतर्गत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, लातूर, चाकूर, रेणापूर व औसा या पाच तालुक्यांचा समावेश झालेला असून या प्रकल्पांतर्गत उपरोक्त  पाच तालुक्यातील 349 गावांची निवड होऊन या गावामध्ये दुग्ध उत्पादनाला चालना देणे, मदर डेअरी प्रकल्प राबविणे तसेच शेतकर्‍यांच्या दुधाला चांगला भाव मिळवून देणे आदि  बाबींचा समावेश असल्याची माहिती श्री.जानकर यांनी दिली.
हंडरगुळी येथील बैल बाजारासाठी वाढीव जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन सदरची जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच  हंडरगुळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे मजबुतीकरण व बळकटीकरण करण्याबरोबरच येथील सर्व मंजूर पदे त्वरीत भरली जातील, असे श्री.जानकर यांनी स्पष्ट केले.