Breaking News

रोज 35 टक्के ग्राहकांकडून रिमोटने वीज चोरी - महावितरण

औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - शहरात दररोज 35 टक्के ग्राहक रिमोटचा वापर करून वीज चोरी करत आहेत, असा दावा महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी  मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. गणेशकर म्हणाले, आगामी दहा दिवसांत शहरातील एक लाख 51 हजार ग्राहकांचे वीज मीटर तपासले जाईल. 23 ऑक्टोबरपासून ही कारवाई  सुरू केली आहे. या तपासणीसाठी जालना येथून 145 कर्मचारी, ग्रामीण भागातील 140 आणि शहरातील साडेचारशे कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. कारवाईत मीटर तपासणी,  विद्युत भार तपासणे, थकबाकी वसूल करणे, वीज पुरवठा खंडित करण्याचे काम केले जाईल. 6500 रहिवासी आणि 42 सिंगल फेज वाणिज्यिक वापराचे जुने मीटर बदलू. दोषी  ग्राहकावर कारवाई करू, असेही गणेशकर म्हणाले.
गणेशकर म्हणाले, मागील दहा वर्षांपासून जालना परिमंडळातील तीन लाख 18 हजार कृषीपंपांची 2365 कोटींची थकबाकी आहे. या बिलाच्या वसुलीसाठी कृषीपंपाचा वीज पुरवठा  खंडित केला जाईल. कृषी पंपाना अत्यल्प दरात वीज पुरवठा करूनही बिल भरण्याचे प्रमाण कमी आहे. औरंगाबाद ग्रामीण विभागात एक लाख 94 हजार शेतक-यांकडे 13 कोटी  76 लाख रुपये थकबाकी आहे. जालना जिल्हयात एक लाख 22 हजार 563 ग्राहकांकडे नऊ कोटी 72 लाख रुपये थकित आहेत. औरंगाबादमधील 1540 शेतक-यांकडे क ोट्यवधींची थकबाकी आहे. जालना भागात वीज बिल वसुलीसाठी शेतक-यांना वीज पुरवठा करणारे 22 डीपींचा वीज पुरवठा बंद केला आहे. वैजापूर भागातील मन्यार बंधा- याजवळील 300 वीज ग्राहकांना केला जाणारा वीज पुरवठा खंडित केला आहे. वाळूजमधील उद्योगांसाठी दिवाळीत 100 एमयूए क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविला आहे. सहा महिन्यांत  पुन्हा एक नवीन ट्रान्सफार्मर बसवू, असेही गणेशकर म्हणाले.