Breaking News

31 ऑक्टोबरपासून सरकार विरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन

मुंबई, दि. 27, ऑक्टोबर - केंद्र आणि राज्य सरकार तीन वर्षाच्या कार्यकाळात पूर्णपणे अपयशी ठरले असून या सरकारविरोधात लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या असंतोषाला  वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 31 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन करणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज  येथे पत्रकार परिषदेत केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी खा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत  राज्य सरकारच्या जनविरोधी धोरण आणि तीन वर्षांतील अपयशी कारभाराविरोधात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी 31 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथून या  जनआक्रोश आंदोलनाचा शुभारंभ होणार आहे. या अंतर्गत राज्याच्या सर्व सहा विभागात सहा जाहीर सभा होणार आहेत. 8 नोव्हेंबर रोजी नोटा रद्दच्या काळ्या निर्णयाला एक वर्ष  होणार आहे त्यामुळे हा दिवस प्रदेश काँग्रेस काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचेही खा. चव्हाण सांगितले.
कर्जमाफीच्या यादीत अनेक बोगस नावे आल्याचे सरकारचेच मंत्री म्हणत आहेत. तर या संपूर्ण प्रकाराची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज  चव्हाण यांनी केली. राज्याच्या इतिहासात कुठल्याही सरकारने शेतक-यांना एवढी अपमानास्पद वागणूक दिली नव्हती, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे  पाटील यांनी केली.