Breaking News

एसटी महामंडळातर्फे 2 ऑक्टोबरपासून ॠसंत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पा’चा शुभारंभ - रावते

मुंबई, दि. 01, ऑक्टोबर - गांधी जयंतीच्या निमित्ताने एसटी महामंडळातर्फे येत्या 2 ऑक्टोबरपासून ‘संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पा’चा शुभारंभ करण्यात येणार  आहे. या अंतर्गत सर्व एसटी बस व बस स्थानके स्वच्छ केली जाणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज  केली.
स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, या मूलभूत संकल्पनेवर आधारित एसटी महामंडळाची सर्व बसस्थानके, बस, प्रशासकीय कार्यालये, चालक-वाहक  विश्रांतीगृहे, प्रसाधनगृहे स्वच्छ करण्यात येणार आहेत. यासाठी महामंडळाने स्वयंसेवी संस्थेची नेमणूक केली आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ एसटीच्या 31 विभागीय  कार्यालयांच्या मुख्य बस स्थानकांवर 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
ही स्वच्छता मोहिम वर्ष अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच किटकनाशक फवारणी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता  आदी उपाययोजना नियमितपणे केल्या जाणार आहेत. यातून स्वच्छतेबरोबरच प्रवासी व कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. या संकल्पातून  स्वच्छ बस व टापटीप बसस्थानके, प्रसाधनगृहे प्रवाशांच्या सेवेत सदैव तत्पर असतील, असा विश्‍वास श्री. रावते यांनी व्यक्त केला.