Breaking News

सैन्य भरतीत 2846 तरुणांची निवड

नागपूर, दि. 19, ऑक्टोबर - सैन्य दलात भरती होण्यासाठी नागपूर व अमरावती विभागातून युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून 42 हजार 548 युवक या पक्रियेत सहभागी  झाले होते. त्यापैकी 2 हजार 846 युवक लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. त्यापैकी 277 युवक नागपूर जिल्हयातून आहेत.
नागपुरातील पोलीस लाईन टाकळी मैदानावर सैन्य दलासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या जिल्हानिहाय 42 हजार 548 युवकांनी  भरती प्रक्रियेला उपस्थित राहून धावण्यापासून तर विविध शारिरीक क्षमता चाचणीला उपस्थित राहिले होते. त्यापैकी 2 हजार 846 युवकांची अंतीम लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यात  आले आहे.भरती प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या समन्वयासाठी समिती गठीत करण्यात आली होती.  यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन डॉ. दिपक लिमसे यांच्यासह विविध शासकीय अधिकार्‍यांचा समावेश होता.