Breaking News

नागपुरात 10 लाखांचा तंबाखू जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

नागपूर, दि. 19, ऑक्टोबर - नागपुरात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुमारे 10 लाख रुपयांचा सुगंधी तंबाखू व पानमंसाला जप्त केला. शहरातील वाडी परिसरातील ट्रान्सपोर्ट  व्यवसायिकाच्या गोदामात हा माल लपवून ठेवण्यात आला होता.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार मेघराज ले-आऊट, वाडी, या ट्रान्सपोर्टचे मालक गणपत माही यांच्या ट्रान्सपोर्टच्या गोदामातून पानमासाला पानपराग 81.6 किलो - किंमत 2  लाख 40 हजार, सुगंधित तंबाखू (सागर) 296 किलो - 5 लाख 92 हजार आणि सुगंधित तंबाखू (सिल्व्हर पॉकिट) 400 किलो - 1 लाख 60 हजार असे एकूण 777.6 किलो  वजनाचा 9 लाख 92 हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा वाहतूक व विक्रीकरीता साठविलेला आढळून आल्यामुळे जप्त करण्यात आला.
सदर कारवाई अन्न व औषध प्रशासनचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त शरद कोलते यांच्या नेतृत्तवाखाली करण्यात आली. गुटखा,  पानमसाला, सुगंधित, स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित, स्वादिष्ट सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित पदार्थाची उत्पादन, वितरण, साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत  प्रशासनाचे दूरध्वनी क्रमांक 0712-2562204 वर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शरद कोलते यांनी केले आहे.