Breaking News

फरशी घेऊन निघालेला ट्रक उलटून दहा ठार, 22 जखमी

सांगली, दि. 22, ऑक्टोबर - फरशी भरलेला मालट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात दहा प्रवासी जागीच ठार झाले. त्यात सात पुरूष व तीन  महिलांचा समावेश असून या अपघातात अन्य 22 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात तासगाव तालुक्यातील मणेराजुरी माळावर शनिवारी पहाटे अडीच  वाजण्याच्या सुमारास घडला. मध्यरात्री अपघात झाल्याने जखमींना पहाटे मिरज व तासगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात ठार झालेल्या दहापैकी सहाजणांची ओळख पटविण्यात यश आले असून दोनजणांची नावे स्पष्ट झाली आहेत. त्यात संगमा सिदाप्पा भिमसे  (वय 60, रा. मंगळूर, ता. सिंदगी, जि. विजापूर) व श्रीमत गुलालप्पा गौड (वय 50, रा. कनमेश्‍वर, ता. जेऊरगी, जि. विजापूर) या दोघांचा समावेश आहे.
एसटीच्या संपामुळे कराड येथे निघालेल्या प्रवाशांनी फरशीने भरलेल्या मालट्रकमध्ये बसणे पसंत केले व तेच त्यांच्या जीवावर बेतले. मध्यरात्रीच्या सुमारास  मणेराजुरी येथून हा ट्रक कराडकडे निघाला होता. काही प्रवासी ट्रकच्या केबिनमध्ये, तर काही प्रवासी फरशीवर बसून प्रवास करीत होते. मणेराजुरीच्या  माळावर हा ट्रक आला असता दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही व हा ट्रक पलटी झाला. त्यावेळी फरशीखाली सापडून दहा प्रवासी  जागीच ठार झाले, तर 22 प्रवासी जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. यातील चौघा जखमींना तासगाव ग्रामीण  रूग्णालयात, तर 11 जखमींना मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.
भाऊबीजेसाठी निघालेल्या या प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याने तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. एसटीच्या संपामुळेच नाईलाजाने या सर्वांना  ट्रकमधून प्रवास करावा लागला होता व हाच प्रवास त्यांच्या जीवावर बेतला. मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटविण्यात पोलिस प्रयत्नशील असून दुपारी  बारा वाजेपर्यंत कोणाचीही ओळख पटली नाही. या घटनेची माहिती मिळताच आमदार श्रीमती सुमन पाटील व सुरेश खाडे यांनी मिरज येथील शासकीय  रूग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.
मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल केलेल्या जखमीत श्रीमती इंदूबाई शामराव निंबाळकर (वय 30, रा. शाबाद, ता. विजापूर, जि. गुलबर्गा),  परशुराम यल्लाप्पा पुजारी (वय 25, रा. ताळीकोटी, ता. मुद्याविहार, जि. विजापूर), बसम्मा यल्लाप्पा पुजारी (वय 45, रा. पेरापूर, ता. अथणी, जि.  बेळगाव), रूपेश शिवाजी राठोड (वय 27, रा. मिरज), संतोष महादेव मंजुळे (वय 16, रा. शाबाद, ता. विजापूर, जि. गुलबर्गा), अशोक रेणाण्णा बिरादार  (वय 50), श्रीमती लक्ष्मीबाई लक्ष्मण मादार (वय 30, रा. सिंदगी, ता. सिंदगी, जि. विजापूर), लक्ष्मण प्रभू मादार (वय 40, रा. सिंदगी, ता. सिंदगी, जि.  विजापूर), बेबी आमीरहुसेन शेख (वय 45, रा. शहापूर, ता. शहापूर, जि. गुलबर्गा), साहेबान्ना मगदाप्पा ज्ञानमंत (वय 65, रा. अंकलबा, जि. गुलबर्गा) व  नागाप्पा शामराव निंबाळकर (वय आठ वर्षे, रा. शाबाद, ता. विजापूर, जि. गुलबर्गा) या 11 जणांचा समावेश आहे.