Breaking News

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली, दि. 02, ऑक्टोबर - विराट कोहलीच्या टीम इंडियाने नागपूरच्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच वन डे सामन्यांची मालिका  4-1 अशी खिशात घातली. त्यानंतर आता 7 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली  आहे. गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. तर 38 वर्षीय आशिष नेहराला संधी देण्यात आली. नेहराने अखेरचा  सामना फेब्रुवारी 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तर विकेटकीपर दिनेश कार्तिकलाही संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग चार अर्धशतकं ठोकणार्‍या अजिंक्य रहाणेलाही टी-20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्याऐवजी शिखर धवनचा  संघात समावेश करण्यात आला आहे. तर रवींद्र जाडेजाला पुन्हा एकदा संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. सलामीवीर केएल राहुलला टी-20 संघात स्थान देण्यात  आलं आहे. टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेलं नाही. शिवाय अनेक दिवसांपासून संघातून बाहेर असलेल्या सुरेश  रैनाचीही यावेळी निराशा झाली आहे.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल , मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह  धोनी(विकेटकीपर), हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्‍वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल