Breaking News

नागपूर जिल्ह्यातील 17 हजार शेतक-यांकडे 41 कोटी थकबाकी

नागपूर, दि. 01, नोव्हेंबर - नागपूर जिल्ह्यातील 17 हजार 418 शेतक-यांनी कृषीपंपासाठी वीज घेतल्यापासून एकदाही पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडे  तब्बल 41 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीदार शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर झाल्यानंतर ही थकबाकीची  आकडेवारी पुढे आली आहे.
नागपूर जिल्ह्यात शेती पंप धारकांची संख्या 90 हजार असून यापैकी 90 टक्के शेतकरी वीजबिलच भरत नाहीत. महावितरणकडून घरगुती, वाणिज्य, औदयोगिक आणि कृषी पंप  धारकांना वीज पुरवठा करते. महावितरणकडून दरमहा जो महसूल गोळा करते त्यापैकी 85 टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. मागील 3 वर्षात राज्यात एकही थकबाकीदार शेतक र्‍याचा कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. त्यामुळे थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने महावितरण समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.  वीज निर्माती,पारेषण आणि वितरण यासाठी येणारा खर्च बघता शेतकर्‍यांनी महावितरणची भूमिका समजून घ्यावी, महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर  बावनकुळे यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा उपविभागात 2526 कृषीपंप ग्राहकांनी 10 कोटी 25 लाख रुपये ,काटोल ग्रामीण उपविभागात 689 ग्राहकांनी 5 कोटी 54 लाख रुपये, नरखेड  उपविभागात 1144 कृषीपंप ग्राहकांनी 5 कोटी 27 लाख रुपये, सावरगाव उपविभागात 1268 ग्राहकांनी 3 कोटी 15 लाख रुपये, कन्हान उपविभागात 138 कृषीपंप वीज ग्राहक ांनी 25 लाख रुपये ,मौदा उपविभागात 1427 ग्राहकांनी 4 कोटी 74 लाख रुपये, रामटेक उपविभागातील 1358 कृषीपंप ग्राहकांनी 2 कोटी 88 लाख रुपये , कळमेश्‍वर उप विभातील 481 कृषी ग्राहकांनी 19 लाख रुपये, पारशिवनी उपविभातील 280 कृषीपंप ग्राहकांनी 14.81 लक्ष रुपये, बुटीबोरी उपविभातील 427 ग्राहकांनी 1 कोटी 17 लाख रुपये  , हिंगणा उपविभागातील 746 कृषीपंप ग्राहकांनी 2 कोटी 94 लाख रुपये थकित ठेवले आहेत. या सर्व ग्राहकांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 चा लाभ घ्यावा असे  आवाहन ऊर्जा मंत्री व महावितरणतर्फे करण्यात आले आहे.