Breaking News

मोबाईल टॉवर बसविण्याच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक करणार्‍यास कारावास

पुणे, दि. 05, ऑक्टोबर - शेतात मोबाईल टॉवर लावून त्यापोटी प्रती महिना 25 हजार रुपये भाडे मिळवून देतो. तसेच कंपनीमध्ये जीप भाड्याने लावून प्रती  महीना 50 हजार रुपये मिळवून देतो, असे खोटे सांगून शेतकर्‍याची 13 लाख 35 हजार रुपये घेऊन फसवणूक करणार्‍या आरोपीस सासवड न्यायालयाने तीन वर्षे  कारावास व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
राजेंद्र गणपत जाधव उर्फ जीवन असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. पुरंदर तालुक्यातील नाझरे येथील शेतकरी लक्ष्मण राघू नाझीरकर यांच्या खोलीत  जाधव भाड्याने रहात होता. जाधव याने मोबाईल टॉवर तसेच कंपनीला जीप भाड्याने लावून देतो असे खोटे सांगून लक्ष्मण नाझीरकर यांची तब्बल 13 लाख 35  हजार रुपयांची जून 2016 मध्ये फसवणूक केली.
नाझीरकर यांनी जाधव उर्फ जीवन विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सासवड येथील न्यायालयाने जाधव यास  शिक्षा ठोठावली आहे.