Breaking News

किटकनाशकांच्या दुकानांवर डल्ला मारून महागड्या कीटकनाशकांची चोरी करणारी टोळी गजाआड

नाशिक, दि. 05, ऑक्टोबर - किटकनाशकांच्या दुकानांवर डल्ला मारून हजारोंचा मुद्देमाल लुटणे आणि कमी किंमतीत विक्री करून पैसा मिळवणारी सराईत  गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण पोलीस या टोळीच्या शोधात होते.
ही टोळी शेती उपयुक्त औषधे, किटकनाशक, बुरशीनाशक रसायने व पावडर नाशिक जिल्हयात गेल्या काही महिन्यांपासुन निफाड, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, वणी,  वडनेर भैरव, चांदवड, ओझर परिसरातील पेस्टीसाईड विक्रेत्यांचे दुकानांतून रात्रीच्या वेळी दुकाने फोडुन महागडे औषधे चोरी करत होते.
महागडी औषधे चोरून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत राहिल्याने विक्रेत्यामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. सततच्या होत असणार्‍या प्रकारांची तक्रार दाखल  करण्यात आली. त्यानुसार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी याबाबत आढावा घेत विशेष पथक स्थापन  केले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी स्थागुशाचे विशेष पथक स्थापन करून सदर गुन्हयांचा समांतर तपास सुरू करण्यास प्रारंभ  केला. दरम्यान, स्थागुशाचे पथकातील अधिकारी व कर्मचारी 02 ऑक्टोबर 2017 रोजी दिंडोरी तालुक्यात सदर गुन्हयांमधील अज्ञात चोरट्यांचा शोध घेत होते.
त्यानंतर खब-यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील सिंदवड गावातील काही तरूण कमी दरात किटकनाशक/ बुरशीनाशक औषधांची विक्री करीत  असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, सिंदवड व खतवड परिसरात रात्रभर पाळत  ठेवली.
त्यानंतर संशय बळावल्याने 1) सोपान दिनकर बस्ते, वय 26, रा. सिंदवड, ता.दिंडोरी, 2) राहुल भाउसाहेब मोरे, वय 26, रा. सिंदवड, ता.दिंडोरी, 3) सतिा  अरूण मोरे, वय 25, रा. कसबे सुकेणे, ता.निफाड ह.मुबहादुरी, ता.चांदवड, 4) शुभम नामदेव गवे, वय 18, रा. खतवड, ता.दिंडोरी यांना शिताफिने ताब्यात
घेतले.
त्यानंतर त्यांना विश्‍वासात घेवुन सखोल विचारपुस केली. त्यांनी त्यांच्या साथीदारांसह पिंपळगाव, दिंडोरी, वणी, वडनेर भैरव, निफाड, कसबे सुकेणे, मोहाडी या  ठिकाणांवर पेस्टीसाईडच्या दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.
यावेळी वापरण्यात येणारे तवेरा वाहन चालक 5) खंडेराव पोपट कडाळे, वय 40, रा. तिसगाव, तादिंडोरी याच्यासह 6) किरण अशोक गायकवाड, वय 18, रा.  बहादुरी, ता.दिंडोरी, 7) गुलाब निवृत्ती लांडे, वय 21, रा. सिंदवड, ता.दिंडोरी यांना सिंदवड येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयितांच्या घराची चौकशी केली असता सुमारे 7 लाख 29 हजार पाचशे एकोणसाठ रूपये किंमतीचे शेतीचे औषधे मिळून आली. गुन्हयांमध्ये वापरलेली तवेरा कार  क्र. एम.एच.04.ई.एच.4960, छोटा हत्ती वाहन क्र. एम.एच.15. सीके. 8558 यासह एक हिरो स्प्लेंडर मोटर सायकल क्र. एम.एच.15.डी.डब्ल्यु.6471 असे एकुण  03 वाहनांसह 13 लाख 24 हजार पाचशे एकोणसाठ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
संशयितांनी दिलेल्या कबुलीवरून जिल्हयातील पिंपळगाव बसवंत, निफाड, दिंडोरी, चांदवड, वडनेर भैरव, ओझर या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले 11  घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सपोनि राम करपे, पोउनि मच्छिंद्र रणमाळे, सपोउनि रवि शिलावट, रामभाउ मुंढे, पोहवा दिपक आहिरे,  हनुमंत महाले, पोना अमोल घुगे, जालिंदर खराटे, राजु सांगळे, पोलीस शिपाई सुशांत मरकड, हेमंत गिलबिले, मंगेश गोसावी, प्रदिप बहिरम, सचिन पिंगळ, संदिप  लगड यांच्या पथकाने रात्रभर पाळत ठेवुन कारवाई केली.