Breaking News

विशेष मुलांसह अंध महिलांनी अनुभवला ’सांगीतिक फराळ ’

पुणे, दि. 19, ऑक्टोबर - दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव , प्रसन्नतेचा उत्सव ,प्रकाशाचा उत्सव मात्र ज्यांचे विश्‍व स्वतःपुरतेच सीमित आहे, जग काय आहे,  हे त्यांना ठाऊक नाही आणि दृष्टीअभावी जीवनात कायमचा दाट काळोख आहे अशा समाजापासून दुर्लक्षित असलेल्या विशेष मुलांसह अंध महिला भगिनींनी दिवाळीनिमित्त ’सांगी तिक फराळ’ कार्यक्रम अनुभवला. आपल्याला कुणी तरी विचारात घेतेय या भावनेने अंध महिलांच्या चेहर्‍यावरचे भाव आनंदित होते तर एरवी सतत एकटी असणारी ही विशेष मुले  हरखून गेली होती. 
निमित्त होते पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकाराने सहकारनगरमधील कै. वसंतराव बागुल उद्यानात आयोजित 19 व्या दिवाळी संध्या  उपक्रमाचे. माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल, नंदकुमार बानगुडे, घनःश्याम सावंत, रमेश  भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, हर्षदा बागुल , नुपूर बागुल, हेमंत बागुल , अभिषेक बागुल, सागर आरोळे , इम्तियाज तांबोळी , विजय बिबवे आदींसह पदाधिकार्‍यांनी कामायनीतील  विशेष मुलांचे आणि अंध महिलांचे जल्लोषात स्वागत केले.त्यानंतर पाच हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्याने परिसर उजळून गेला. पर्यावरणाचे जतन करण्यासाठी आतिषबाजी  टाळून केवळ प्रतीकात्मक फुलबाज्या पेटविण्यात आल्या. संगीताची धून आणि उपस्थित नागरिकांच्या अलोट गर्दीने दिवाळी संध्याचा कार्यक्रम रंगत गेला. फराळ आणि संगीतकार  आर. डी बर्मन यांच्या बहारदार गीतांवर आधारित मूड्स ऑफ आर. डी. या राधिका अत्रे प्रस्तुत सांगीतिक कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.