Breaking News

अंगणवाडी सेविकांचे शाप सरकारला लागतील - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 28, सप्टेंबर - सरकाकरने अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव प्रतिष्ठेचा करू नये. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अमान्य कराल तर त्या  मातांचे शाप सरकारला लागल्याशिवाय रहाणार नाहीत, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिला. संपावर असलेल्या अंगणवाडी  सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज आझाद मैंदान येथे कृती समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी अंगणवाडी सेविकांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचे नेतृत्व करायला नाही तर नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आलो आहे. आम्ही सत्तेत  असलो तरी आमची मने अजून जिवंत आहेत. मुर्दाड मनाने आम्ही सरकारचा कारभार करू शकत नाही. निवडणुकीवेळी तुम्हाला शिवरायाची आठवण येते. त्या  शिवरायांच्या माता भगिनींचे शाप तुम्हाला लागल्याशिवाय रहाणार नाहीत. फडणवीस सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्‍न अकारण प्रतिष्ठेचा बनवला  आहे. लोकशाहीच्या मार्गाने सरकार ठोकशाही करणार असेल तर ती आम्ही मोडून काढू असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अंगणवाडी सेविकांची झोप उडवून मुख्यमंत्री स्वत:ची स्वप्ने साकारण्यासाठी विदेशाचे दौरे करत आहेत. सरकारला असा विकास असेल तर  सरकारला नमवण्याची ताकद आमच्याकडे आहे. अंगणवाडी सेविका आई बनून कुपोषित बालकांचे पालनपोषण करतात. अशा मातांना त्यांच्या मागण्यांसाठी संपावर  जाण्याची वेळच येता कामा नये. आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आंदोलनाची जी दिशा ठरवतील त्यामध्ये शिवसेना सहभागी होईल, असेही ठाकरे यांनी  नमूद केले.