Breaking News

आर्थिक संबंध वाढविण्याबरोबरच महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यास द. कोरिया तयार

मुंबई, दि. 28, सप्टेंबर - महाराष्ट्राशी असलेले आर्थिक संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्याबरोबरच महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि  पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास दक्षिण कोरियाने उत्सुकता दाखविली आहे. दक्षिण कोरियाचे उपपंतप्रधान तथा वित्तमंत्री किम  डाँगयून यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज याबाबत सेऊल येथे सकारात्मक चर्चा झाली.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने केलेली कार्यवाही आणि त्यामुळे होणारे लाभ याबाबत श्री. डाँगयून यांनी विस्ताराने जाणून घेतले.  महाराष्ट्रात सुरू असलेल्या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा असल्याचे श्री. किम डाँगयून यांनी यावेळी सांगितले.
विविध उद्योगसमूह राज्यात गुंतवणूक करणार
महाराष्ट्रातील गतिमान विकास प्रक्रियेमुळे औद्योगिक क्षेत्रात निर्माण होत असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी दक्षिण कोरियातील कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी,  असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध उद्योगसमुहांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान केले. या आवाहनाला विविध कंपन्यांच्या प्रतिनिधी मंडळाने सकारात्मक  प्रतिसाद दिला. राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मितीसह विकासाच्या प्रक्रियेस चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी  सांगितले.
ह्योसंग कॉर्पोरेशन सोबतच्या बैठकीने मुख्यमंत्र्यांनी आपल्या आजच्या दिवसभराच्या बैठकींच्या सत्राचा प्रारंभ केला. कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी  सेंटरचे प्रमुख एच. एस. चो तसेच इंडस्ट्रीयल मटेरियल्स परफॉर्मन्स ग्रुपचे उपाध्यक्ष यू सूक च्युन यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ह्योसंग कॉर्पोरेशन ही दक्षिण  कोरियातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून वस्त्रोद्योगाला लागणार्‍या स्पॅन्डेक्सच्या निर्मितीत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास त्यांनी अनुकूलता दर्शविली.
त्याचबरोबर ह्युंदेई इंजिनिअरिंग अँड कंस्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सू ह्यून ज्युंग यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. महाराष्ट्रात  चाकण येथे ह्युंदेईचा प्रकल्प कार्यरत आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आणि वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गासंदर्भात कंपनीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी  या भेटीत व्यक्त केली. तसेच एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष जेफ हाँग आणि इंडिया प्रोजेक्टचे प्रमुख डी. एच. कू यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नागपूर येथे  एलसीडी फॅब युनिट उभारण्यासाठी मेक इन इंडिया कॉन्क्लेव्हदरम्यान ट्विनस्टारसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला होता. त्या कराराला आणखी व्यापक  करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात शेतकर्‍यांना सौर उर्जेवर आधारित कृषीपंप देण्यासाठी सुरू असलेल्या स्वतंत्र फीडरच्या प्रकल्पासाठी  सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी एलजी कंपनीला केली.
पॉस्कोशी यापूर्वी करण्यात आलेल्या दोन सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीला गती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पॉस्कोचे व्यवस्थापकीय संचालक ओ इन ह्यान  यांच्याशी चर्चा केली. पॉस्को ही स्टील उत्पादनातील आघाडीची कंपनी असून त्यांचे महाराष्ट्रातील विले भागड (जि. रायगड) आणि तळेगाव (जि. पुणे) येथे दोन  प्रकल्प सुरू आहेत. देवू इंजिनिअरिंग अँड कंस्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साँग मून सून यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्राची  गतिमान प्रगती, विविध पायाभूत प्रकल्पांची निर्मिती आणि त्यातून उपलब्ध होणार्‍या संधींचा लाभ घेण्यासाठी कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, अशी विनंतीही  मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांच्या सन्मानार्थ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. फडणवीस यांनी उपस्थित उद्योजकांशी  मनमोकळा संवाद साधला. त्याचप्रमाणे दक्षिण कोरियात प्रशिक्षणासाठी आलेल्या 15 भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकार्‍यांच्या पथकानेही  मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.